एकतर नगर पालिका निवडणुका पाच पाच वर्षे रखडलेल्या होत्या. त्यामुळे राजकीय पक्ष, स्थानिक नेते आणि उमेदवार निवडणुकीची आतुरतेने वाट पाहत होते. निवडणूक आयोगाच्या घोळामुळे निवडणूक कधी होणार हे स्पष्ट होत नव्हते. अखेर २ डिसेंबर रोजी मतदान होऊन ३ डिसेंबरला निकाल लागेल, याची घोषणा निवडणूक आयोगाने केल्यावर सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला. परंतु न्यायालयीन खटल्यांच्या पेचामुळे निवडणूक आयोगावर निवडणूक पुढे ढकलण्याची नामु्ष्की ओढावली. अगदी निवडणुकीला काही तास शिल्लक असताना आयोगाने निवडणूक पुढे ढकलत असल्याचे जाहीर केले. यावरून राज्यात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आणि आयोगावर आरोपांची राळ उडवली आहे.
advertisement
राज ठाकरे यांचा संताप
मतदान काही तासांवर आलेले असताना राज्यातील २४ नगरपरिषदांची निवडणूक लांबणीवर टाकल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. सगळ्या देशात मनमानी सुरू आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. याआधाही निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर राज ठाकरे यांनी अनेक आक्षेप नोंदवले होते. निवडणूक घेण्याशिवाय आणि मतदार नोंदणीशिवाय निवडणूक आयोगाला काम काय असते? जर हे काम निवडणूक आयोग करीत नसेल तर काय करतंय? असे सवाल विचारून राज ठाकरे यांनी आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. शिवाय महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची दोन ते तीन वेळा भेटून आक्षेप नोंदवले होते.
