याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी विभागात शहरासह ग्रामीण भागातील 12 हून अधिक एसटी बसेस भंगारात गेल्या आहेत. त्यामुळे जिल्हा अंतर्गत एसटी बससेवा विस्कळीत झाली आहे. गाड्यांची संख्या कमी पडत असल्यामुळे कित्येक फेऱ्या रद्द होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांना तासनतास बसेसची वाट पाहावी लागत आहे. नाईलाजास्तव ग्रामीणच्या बसेस शहराला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना देखील त्रास सहन करावा लागत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार आणि सामान्य प्रवासी वैतागले आहेत.
advertisement
Fishing: कोकणात मोठं संकट! समुद्रातून बोटी परत फिरल्या, मासेमारी ठप्प, कारण काय?
दिवाळीनंतर रत्नागिरी आगारात नवीन 25 स्मार्ट बस येणार आहेत. विभाग नियंत्रकांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी आगारात पूर्वी 10 नवीन बसेस आल्या होत्या. त्यांना प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. दिवाळीनंतर आणखीन 25 स्मार्ट बसेस येणार आहेत. सीएनजी बसेसही येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही.
दरम्यान, रत्नागिरी आगारात आता नवीन बसेस येण्यास सुरुवात झाली आहे. 10 स्मार्ट बसं जिल्हांतर्गत धावत आहेत. तसेच रत्नागिरी विभागातील मंडणगड लांजा, राजापूर, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, खेड, दापोली या आगारातही स्मार्ट बसेस आलेल्या आहेत. आता दिवाळीनंतर २५ स्मार्ट बसेस येणार आहेत. त्यामुळे रत्नागिरी आगारातील बससेवा पुन्हा सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे.
याशिवाय, चिपळूणमध्ये प्रायोगिक तत्वावर जुन्या बसेसचं सीएनजीमध्ये रुपांतर करण्यात आलं आहे. हा प्रयोग यशस्वी झाला असून आता रत्नागिरी आगारात देखील 60 सीएनजीचे बसेस येणार आहेत.