Fishing: कोकणात मोठं संकट! समुद्रातून बोटी परत फिरल्या, मासेमारी ठप्प, कारण काय?
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Fishing: सध्या शेकडो बोटी मुरुडच्या किनाऱ्यावर विसावल्या असून मासेमारी बंद आहे.
रायगड: मराठवाड्यात धुमाकूळ घातल्यानंतर आता पावसाने आपला मोर्चा कोकणाकडे वळवला आहे. कोकणात गेले दोन दिवस वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नवरात्रौत्सवात जनजीवन विस्कळित झालं आहे. मुरुडमधील बाजारपेठ ठप्प झाली आहे. मासेमारीवर देखील पावसाचा परिणाम झाला आहे.
मुरूड तहसीलदार कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांत 97 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. समुद्रात सोसाट्याचा वारा आणि मोठा लाटा उसळत असल्याने मासेमारीच्या बोटी तात्काळ आगरदांडा खाडीत बोलावण्यात आल्या आहेत. परिणामी ऐन नवरात्रीत मासेमारी व्यवसाय ठप्प झाला आहे. कोळी बांधव देवीला माशांचा नैवेद्य दाखवत असतात. मासेमारी बंद असल्यामुळे ताज्या माशांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.
advertisement
भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. किनारपट्टीलगत ताशी 49 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व बंदरांवर सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. सध्या शेकडो बोटी मुरुडच्या किनाऱ्यावर विसावल्या आहेत.
advertisement
पुढील काही दिवसात पावसाचा जोर कमी होण्याच शक्यता आहे. त्यानंतर मच्छीमारी बोटी मासेमारीसाठी रवाना होतील, असे मच्छीमार बांधवांकडून सांगितलं जात आहे. मुरुड तालुक्यात नवरात्रीनिमित्त विविध ठिकाणी सार्वजनिक उत्सव सुरू आहेत. मात्र, सततच्या पावसामुळे उत्सवाच्या कार्यक्रमांवर विरजण पडलं आहे.
मुरूड -खारअंबोली गावातील शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरुड शहरासह पंचक्रोशीत यंदा चांगला पाऊस झाला आहे. पण, सध्या पडणारा पाऊस शेतीसाठी धोकादाय ठरू शकतो. भातशेतीला करपा रोगाचा सामना करावा लागू शकतो. भाज्यांच्या मळ्यांचं आणि बागांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
Location :
Raigad,Maharashtra
First Published :
September 30, 2025 11:55 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Fishing: कोकणात मोठं संकट! समुद्रातून बोटी परत फिरल्या, मासेमारी ठप्प, कारण काय?