अनेक महिला कौटुंबिक, सामाजिक दबावामुळे नाईलाजास्तव मुंडन करून घेत असून यामुळे महिल्यांच्या सन्मानाने जगण्याच्या अधिकारावर गदा आणली जात आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने जिल्हाधिकारी पुणे यांना तात्काळ चौकशी करत अशा प्रथांना आळा घालण्यासाठी मंदिर प्रशासन आणि संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत.
advertisement
रुपाली चाकणकर काय म्हणाल्या?
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे सौ. देवयानी समीर मोरे यांनी गंभीर तक्रार दाखल केली आहे. प्रकरण अत्यंत गंभीर असून पीडित महिलांची सुरक्षितता तात्काळ सुनिश्चित करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम, 1993 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून, आपणास कळविण्यात येते की दिनांक २२ डिसेंबर 2025, पुणे जिल्ह्यातील दौड तालुक्यातील रोटी येथील श्री. रोटमलनाथ मंदिरात मुलगा झाल्यानंतर आईचे सक्तीने मुंडन करण्याची आणि जावळ काढणे ही अनिष्ठ आणि अमानवीय प्रथा सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भातील तक्रारीत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत.
धार्मिक परंपरेच्या नावाखाली महिलांना विद्रुप करणे आणि त्यांच्यावर मानसिक दबाव टाकणे हा अन्याय आहे. अनेक महिलांना कौटुंबिक आणि सामाजिक दबावामुळे नाईलाजास्तव हे मुंडन करून घ्यावे लागते. ही प्रथा महिलांच्या सन्मानाने जगण्याच्या अधिकारावर गदा आणणारी आहे, असे मुद्दे उपस्थित करून सदर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन स्थानिक पातळीवर चौकशी करावी, असे आदेश महिला आयोगाने दिले आहेत.
अशा प्रकारच्या सक्तीच्या प्रथांना आळा घालण्यासाठी मंदिर प्रशासन आणि संबंधितांना कडक सूचना द्याव्यात. ज्या महिलांना या प्रथेसाठी भाग पाडले जात आहे, त्यांना कायदेशीर संरक्षण देण्यात यावे. तसंच या प्रकरणी आतापर्यंत काय कारवाई केली आहे, याचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा, १९९३ कलम १२ (२), व १२ (३) नुसार (सात दिवसाच्या आत महिला आयोगाला पाठवा, अशा सूचना रुपाली चाकणकर यांनी केल्या आहेत.
