भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या जवळीकीमुळे रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. खरात याच्यासोबत चाकणकर यांची अनेक छायाचित्र प्रसिद्ध झाल्याने महायुती सरकारची चांगलीच नाचक्की झाली होती. याआधीही त्यांच्यावर अनेक प्रकरणांत आरोप झाले होते. चमकोगिरी करणाऱ्या म्हणून त्यांना हिणवले गेले. आताही रोहित पवार यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना त्यांनी चमकोगिरी केल्याची टीका केली.
advertisement
पुढच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण? रोहित पवार यांनी ४ नावं सांगितली
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर चमकोगिरी करणाऱ्यापेक्षा निवृत्त IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांच्यासारख्या निष्पक्ष, निर्भीड आणि कायद्याचं सखोल ज्ञान असलेल्या किंवा ॲड. वर्षा देशपांडे यांच्यासारख्या सामाजिक क्षेत्रात मोठं काम असलेल्या किंवा ‘मासूम’च्या मनिषा गुप्ते किंवा निवृत्त IAS अधिकारी मेधा गाडगीळ यांची किंवा यांच्यासारख्या इतर योग्य अराजकीय व्यक्तींची नेमणूक करणं गरजेचं आहे, असे रोहित पवार म्हणाले.
महिला अध्यक्षपदासंदर्भातील निर्णय सुनेत्रा काकींनाच घ्यायचाय
वरील नावांचा विचार झाला तरच राज्यातील पिडीत महिलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल आणि एखाद्या वाईटातूनही चांगलं घडल्याचं समाधान मिळेल..! असे सांगतानाच पुढच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण याचा निर्णय सर्वस्वी सुनेत्राकाकींनाच घ्यायचाय, असे सांगताना त्यांचा रोख भाजपकडे असल्याचे दिसते. सुनेत्रा पवार महिला आयोगाच्या अध्यक्षपदासदंर्भात योग्य निर्णय घेतील, अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.
