महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याशी गेल्या काही काळापासून रुपाली पाटील यांचा संघर्ष सुरू आहे. फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी महिलेची बदनामी केल्याचा आरोप करून रुपाली पाटील ठोंबरे यांनी पुन्हा एकदा संघर्ष छेडला. अगदी त्यांना चाबकाने फोडून काढण्याची भाषा वापरली. त्याची दखल पक्षाने लगोलग घेऊन कारवाई केली.
मी अजितदादांशी बोलणार- रुपाली पाटील
advertisement
आज जाहीर झालेल्या यादीत माझ्यासह अमोल मिटकरी आणि वैशालीताई नागवडे यांचे नाव नसल्याचे कळले. या पार्श्वभूमीवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्याशी बोलणार असल्याचे रुपाली पाटील म्हणाल्या. कारवाईबद्दल मी अजित पवार यांच्याकडून माहिती घेणार आहे, असे त्या म्हणाल्या. त्यांच्या बोलण्यातून अप्रत्यक्षपणे एक प्रकारची नाराजी व्यक्त होत आहे.
मी आज पुण्याच्या बाहेर आहे,प्रवासात असल्याने माझा संपर्क होऊ शकला नाही. आज पक्षाने नव्याने प्रवक्त्याची नेमणूक केली आहे. त्यात माझ्यासह आमदार अमोल भाऊ मिटकरी, वैशालीताई नागवडे यांची नावे नाहीत. आम्ही येऊ घातलेल्या निवडणुकांना सामोरे जाणार सज्ज आहोत. पक्षाचे काम जोमाने करणार आहोत.या यादी बद्दल मा.अजितदादाना भेटून बोलून या विषयी माहिती घेईल मग आपल्या सर्वांशी सविस्तर बोलेल, असे त्यांनी सांगितले.
रुपाली पाटील माझी चांगली मैत्रीण, ती योग्य निर्णय घेईल- सुषमा अंधारे
रुपाली पाटील हिच्यावर पक्षाने कारवाई केल्याचे समजले. रुपाली हुशार आहे. ती योग्य भूमिका घेईल, असे सूचक वक्तव्य शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले.
