नाशिकमध्ये आज भाजपमध्ये पक्षप्रवेशावरून मोठा ड्रामा घडला. ठाकरे गटाचे नेते विनायक पांडे आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक शाहू खैरे यांचा भाजपात प्रवेश पार पडला. या प्रवेशामुळे देवयानी फरांदे यांनी नाराजी व्यक्त केली.
"गेल्या ४० वर्षांमध्ये मी स्वत: माझ्यावर कधी अन्याय झाला, त्याबद्दल कधी भूमिका घेतली नाही. पक्षाची मी निष्ठावन कार्यकर्ती आहे. सर्वांनीच नेते व्हायचं, प्रत्येकांने आपलं आपलं पाहायचं, मग पक्षाच्या कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्याला पाठबळ कुणी द्यायचं. बस्स तेवढाच विषय आहे. गहिवरून आलं, याचं कारण म्हणजे, मी एक अतिशय सामन्य कार्यकर्ती आहे. माझ्या डोळ्यासमोर कार्यकर्त्याचा बळी दिला जात असेल तर हे काही बरोबर नाही, असं म्हणत देवयानी फरांदे यांचे डोळे भरून आले.
advertisement
"जे आज पक्षात आले आहे, पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी म्हणून मी त्याचंं स्वागत करते. पण आज जे पक्षात घडलं ते मला काही आवडलं नाही" असंही फरांदे यांनी स्पष्ट सांगितलं.
काही दलाल आणि स्वार्थी लोकांनी...
'मला कुणी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असेल तर जरूर प्रयत्न करावा. मी कशाला घाबरत नाही. पण, या सगळ्या विषयाच्या माध्यमातून माझ्या भूमिकेत पक्षाचे नेते सोबत उभे राहिले असते तर पक्षााच्या कार्यकर्त्यांना वेगळा संदेश गेला असता. मी गिरीश महाजन यांच्यावर नाराज नाही. त्यांना चुकीच्या पद्धतीने ब्रिफ केलं गेलं आहे. काही दलाल आणि स्वार्थी लोकांनी घरात तिकीट मिळावी, या स्वार्थातून या सगळ्या विषयाचं राजकारण झालं आहे, असं म्हणत दलाल कोण आहे, यावर फरांदे यांनी बोलण्याचं टाळलं.
'निष्ठावंतावर अन्याय झाला नाही पाहिजे'
"पक्षाच्या दृष्टीकोनातून पक्षप्रवेश होतो, पक्ष मोठा होतो, पण पक्ष मोठा होत असताना निष्ठावंतावर अन्याय झाला नाही पाहिजे. आलेल्या लोकांचं मी स्वागत करते. वरिष्ठांपर्यंत मी हा विषय पोहोचवणार आहे. माझं गिरीश महाजन यांच्याशी बोलणं झालं आहे. पक्षप्रवेश जरी झाला असेल तरी तिकीट फायनल झाले नाही, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं आहे' असंही फरांदेंनी सांगितलं.
