इतर मागास प्रवर्ग अर्थात ओबीसीमधून मराठा आरक्षणाची मागणी करीत मनोज जरांगे पाटील यांच्यासह हजारो मराठा बांधवांनी आझाद मैदानात ठिय्या मांडला आहे. त्यांची बाजू जाणून घेण्याकरिता न्या. शिंदे समितीचे अध्यक्ष संदीप शिंदे आणि समितीमधील इतर सदस्यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. समिती आणि जरांगे पाटील यांच्यात साधकबाधक चर्चा झाली. बॉम्बे, औंध गॅझेटिरससाठी मी तुम्हाला वेळ देतो मात्र सातारा आणि हैद्राबाद गॅझेटियर नोंदीचा आधार घेऊन तत्काळ अंमलबजावणी कराच, असा आग्रह मनोज जरांगे पाटील यांनी धरला.
advertisement
सर्व मराठ्यांना कुणबी ठरवता येणार नाही
सातारा गॅझेटनुसार मराठवाड्यातील सगळा मराठा हा कुणबी आहे. आमची मागणी आहे की तसा शासकीय अध्यादेश काढा, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. त्यावर अशी मागणी मान्य करण्यास न्या. शिंदे यांनी स्पष्ट नकार दिला. एखादा समाज अमुक एका प्रवर्गात टाकायचे असल्यास ते काम राज्य मागासवर्ग आयोग करतो. असे काम करणे आमच्या समितीच्या अखत्यारित येत नाही, असे न्या. शिंदे म्हणाले.
नोंदी आहेत पण आडनावे नाहीत, मग ते नेमके कोण? जरांगेंचा प्रश्न
त्यावर मराठा समाज कुणबी आहे हे तुम्ही मान्य करीत नाही मग ओबीसीमध्ये ३५० जाती कशा गेल्या? काही दिवसांपूर्वी काही जातींचा समावेश ओबीसी प्रवर्गात कसा केला गेला? असे सवाल करून जर सातारा आणि हैद्राबाद गॅजेटच आमचे आहे आणि त्यात आमची नोंद मराठा समाज हाच कुणबी अशी लागली आहे, तर तुम्हाला मान्य करायला कसली अडचण आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी विचारले. त्यावर गॅझिटियरमध्ये कुणबी नोंदी आहेत परंतु त्यात नावे-आडनावे नसल्याने कुणाच्या कुणबी नोंदी आहेत, हे तपासावे लागेल,संबंध लावावे लागतील, असा युक्तिवाद न्या. शिंदे (निवृत्त) यांनी केला. त्यावर मराठ्यांसाठीच ते गॅझिटियर आहे, त्यात नोंदी आमच्याच असतील ना, दुसऱ्या कुणाच्या असतील, असा उलटप्रश्न जरांगे पाटील यांनी विचारला.
जरांगेंचा मराठवाडी शैलीत युक्तिवाद
दुसऱ्या जातीला ओबीसी प्रवर्गात समावेश करायचे असते त्यावेळी तुमचा अभ्यास, प्रक्रिया असे काही लागत नाही, थेट घंटी वाजते. मात्र मराठा समाजाच्या आरक्षणावेळीच प्रक्रिया, अभ्यास असे मुद्दे पुढे येतात. मग अगरबत्ती, नारळ, गुलाल असे तुम्हाला साग्रसंगीत लागते. आमची पण घंटी वाजवून पुजा करा की... असे मराठवाडा शैलीत जरांगे पाटील म्हणाले. इथे समितीला पाठवले जाते, मात्र सरकार येत नाही. कायदेमंडळ आणि राज्यपाल यांच्या सगळ्यांचा अपमान करत आहेत, अशी टीका जरांगे यांनी केली.