हातनूरपासून दीड किलोमीटरवरील निसर्गरम्य डोंगरावर होनाईदेवीचे देवस्थान आहे. मंदिराकडे जाण्यासाठी पायथ्यापासून अंदाजे साडेतीनशे पायऱ्या आहेत. घटस्थापनेपासून होनाईच्या नवरात्रोत्सवास प्रारंभ होतो. दररोज गुरव बंधू देवीची वेगवेगळ्या रुपात पूजा बांधतात. हरिजागर दिवशी गावातील धनगरी ओव्यांचा कार्यक्रम असतो.
advertisement
तसेच वर्षभर आजूबाजूच्या परिसरातील भाविक देवीच्या दर्शनासाठी डोंगरावर जातात. दसऱ्याला पालखी मिरवणूक असते. यानंतर आपट्याची पाने लुटण्याचा कार्यक्रम होतो. मांजर्डे रस्त्याला 'शिलंगणाचे टेक' येथे आपट्याच्या पानाचा बिंडा घट्ट बांधून ठेवला जातो. येथे भक्त सोने लुटतात.
advertisement
होनाई ट्रस्टचे अध्यक्ष मोहन पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी मंदिर परिसर सुशोभीकरण, विद्युत रोषणाई व ध्वनियंत्रणा आदी कामे करतात. या निमित्ताने गाव एकत्र येते. ही परंपरा आजच्या युवकांनी जपावी, अशी अपेक्षा मोहन पाटील यांनी व्यक्त केली.
advertisement
होनाई देवीचे महात्म्य - हातनूर येथील श्री होनाई देवी ही तुळजापूरच्या भवानी मातेचा अवतार समजली जाते. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या देवीच्या दर्शनाला छत्रपती शिवाजी महाराज व राजा रामदेवराय आल्याची इतिहासात नोंद आहे. सर्वाधिक उंच वनराईने बहरलेला डोंगर आणि नयनरम्य परिसर, 'महाराष्ट्र पर्यटन विकास' खात्यामार्फत व 'होनाई ट्रस्ट' वतीने होत असलेला विकास यांमुळे भाविकांसह पर्यटकांना पर्वणीचे ठिकाण ठरत आहे. पंचक्रोशीतील हजारो लोकांना "नवसाला पावणारी देवी" असे महात्म्य आहे. यामुळे मंदिरात दर्शनासाठी भाविक प्रचंड गर्दी करतात.
advertisement
असा आहे मंदिर परिसर - पर्यटन आणि देवीच्या दर्शनासाठी आणि एक दिवसाचा आनंद घेण्यासाठी हजारो लोक इथे येतात. हा परिसर पावसाळ्यात विविध प्रकारच्या झाडाझुडूपांनी बहरतो. प्रचंड वनराई फुलते. संपूर्ण डोंगर हिरवागर्द होतो. डोंगरावर सपाट प्रदेश आहे. एक विहीर आहे. इतक्या उंचीवरही या विहिरीला पाणी आहे. तसेच याठिकाणी एक शिवकालीन तलावही आहे.
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन भूमी - मठाधिपती आद्य गुरू श्री शंकराचार्य यांचे या ठिकाणी वास्तव्य होते. इसवी सन 1026 साली हातनुर गाव वसले आहे. तेव्हापासून होनाई देवीचे मंदिर असल्याची नोंद पुरातत्व खात्याकडे आहे. आई तुळजाभवानीचा अवतार असल्यामुळे याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज दर्शनासाठी येत. त्यांच्या घोड्यांच्या टापा अजूनही संग्रहित स्वरूपात असल्याचे येथील पुजारी रामचंद्र गुरव यांनी सांगितले. यावेळी डोंगरावर किल्ला बांधण्याचा राजांचा विचार होता. त्या दृष्टीने काम सुरू केले होते. मात्र, 2 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या रांगा आहेत. या ठिकाणाहून शत्रूनी तोफ डागली तर धोका होऊ शकतो. यामुळे राजांनी किल्ला बांधण्याचे रद्द केल्याचे लोक सांगतात.
अशी आहे पौराणिक आख्यायिका - प्राचीन काळी ओढ्यालगत परीट घाटावर देवीचे मंदिर होते. मात्र, पाणी अंगावर पडत असल्यामुळे देवी अप्रकट झाली. गावाच्या पश्चिमेस काही अंतवर एक डोंगर आहे. या डोंगरावर ग्रामस्थांनी खोदकाम सुरू केले. यावेळी घोड्यावर स्वार झालेली, देवीची मूर्ती सापडली. या डोंगरावरच देवी प्रकट झाल्याचा साक्षात्कार ग्रामस्थांना झाला. यानंतर याठिकाणी ग्रामस्थांनी देवीचे मंदिर बांधले. दरम्यान, माघ पौर्णिमेला हातनूरला श्री होनाई देवीची यात्रा भरते.
घटस्थापना ते विजयादशमी पर्यंत दररोज पहाटे गावातील व पंचक्रोशीतील मंडळी डोंगरावर काकड आरतीला जातात. विद्युत रोषणाईने संपूर्ण डोंगर उजळून निघतो. विजयादशमी दिवशी हत्तीवरून देवीची पालखीतून मिरवणूक होते. श्रावण महिन्यात मंगळवार आणि शुक्रवारी आजूबाजूच्या गावातून तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येतात.
पर्यटन स्थळ म्हणून परिसर होतोय विकसित - हातनूरच्या श्री होनाई देवी डोंगर परिसराला तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत 'ब' वर्ग दर्जा मिळाला आहे. डोंगर परिसराचा विकास कोट्यवधी रुपये खर्चुन करण्यात आला आहे. मुख्य मंदिराचे काम अंतिम टप्प्यांत आले असून प्रमुख शिखराचे काम सुरू आहे. शासनाने अलिकडे 3 कोटी 76 लाख या कामासाठी मंजूर केले.
हातनुरचे होनाई देवी मंदिर व पर्यटन स्थळ हे देशातील पर्यटनाच्या नकाशावर आले आहे. हातनुरच्या श्री होनाई देवीचा महिमा संपूर्ण राज्यात पसरला आहे. येणाऱ्या काळात शासनाच्या निधीतून भक्तांच्या सोयीसाठी येथे आलिशान भक्त निवास, हॉटेल, दुकाने गाळे, जप, ध्यान मंडप, पिण्याच्या पाण्याची सोय, गाडी पार्किंग अशा सोयी होणार आहेत. (सूचना - मंदिराच्या आख्यायिकेबाबत ही माहिती संबंधितांनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.)
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
October 07, 2024 12:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन भूमी, तुळजापूरच्या भवानी मातेचा अवतार होनाईदेवी माता मंदिराचा अनोखा इतिहास, PHOTOS