सांगली, 02 ऑक्टोबर : पाण्याच्या प्रश्नावर सांगलीत सुरू असलेल्या आमरण उपोषणादरम्यान राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांची प्रकृती खालवली आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या पथकाकडून आमदार सुमनताई पाटील यांच्याही प्रकृतीची तपासणी करण्यात आली आहे. रोहित पाटील यांची कालपासून तब्येत बिघडलेली आहे, मात्र तरीही ते उपोषणामध्ये सहभाग झाली आहे.
आज दुपार रोहित पाटील यांना ताप पुन्हा वाढल्याने प्रकृती जास्त बिघडली आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या पथकाकडून तपासणी करत प्राथमिक औषध उपचार करण्यात आला आहे. तसंच सध्या प्रकृती स्थिर असली तरी आंदोलनामुळे ती आणखी बिघडू शकते,असं डॉक्टरांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
advertisement
भाजप नेत्यांचं रोहित पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा
दरम्यान, सांगलीमध्ये आर.आर. आबा गट विरुद्ध खासदार संजय काका पाटील यांच्या पाण्यावरून संघर्ष पेटला आहे. खासदार संजयकाका पाटील यांच्याकडून आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांच्या उपोषणावर सातत्याने टीका करण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला मात्र भाजपाचे नेते आणि माजी जिल्हाध्यक्ष सुमनताई आणि रोहित पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. उपोषणस्थळी पृथ्वीराज देशमुख यांनी भेट देऊन जाहीर पाठींबा दिला आहे.एका बाजूला भाजपाचे खासदार उपोषणाला विरोध करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला भाजपच्याच खासदारांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख जाहीर पाठिंबा देत असल्याने राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.
रोहित पाटील यांची काय आहे मागणी?
टेम्भू योजनेच्या तिसऱ्या सुप्रमा मंजूर करण्यासाठी आम्ही आमरण उपोषण करत आहे. यासाठी गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा करत होतो. ज्यावेळी युतीचे सरकार होते त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यांच्याकडे सुप्रमा मान्यतेची मागणी केली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या काळात जलसंपदा मंत्री जयंत पाटील होते त्यांच्याकडे मागणी केली. राज्य शासनाला विनंती केल्यानंतर जयंत पाटील यांनी लवादाची बैठक यशस्वी करून मान्यता दिली. काल या पाण्याची मान्यता देण्यात आली. महाविकास आघाडीचे सरकार जाऊन दीड वर्षे झाली. जो कागद सुमनताईंनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर दिला. तो मागण्याच्या दीड वर्षात का दिला नाही? पाण्याची उपलब्धता केल्याने आम्ही उपोषण मागे घेऊ असे कोणाला वाटत असेल तर सुप्रमा मंजूर केल्याशिवाय आणि प्रत्यक्षात काम कधी सुरू होईल हे जोपर्यंत सांगत नाहीत तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार आहे.
आमदार सुमनताई पाटील यांच्या आंदोलनाचा धसका मुख्यमंत्र्यांनी घेतला. मात्र, आम्ही उपोषणाचा इशारा दिल्यानंतर टेम्भूच्या सुप्रिमोला मान्यता देण्यात आली. मग मागील दोन वर्षाच्या काळात हा निर्णय का घेतला नाही याचे उत्तर शासनाने द्यावे. मुद्दाम तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील वंचित ठेवण्याचा डाव काही लोकांनी केला का हे देखील तपासण्याची आवश्यकता आहे. माझ्या भवितव्याची काळजी हे मतदार संघातील साडे तीन लाख मतदार ठरवतील इतर कोणीही काळजी करण्याची आवश्यकता नाही. - रोहित पाटील
