माजी महापौर विनायक पांडे, मनसेचे माजी महापौर, सध्या शिवसेनेत असलेले यतीन वाघ, मनसेचे माजी आमदार नितिन भोसले, मनसेचे स्थानिक नेते दिनकर पाटील, काँग्रेस नेते शाहू खैरे यांनी गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. या प्रवेशाला भाजपच्या निष्ठावंतांनी प्रखर विरोध केला. परंतु त्यांच्या विरोधाकडे लक्ष न देता महाजन यांनी पक्षप्रवेश घडवून आणला. त्यावेळी निष्ठावंत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या सगळ्यावर संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला.
advertisement
जगातला सर्वात मोठा पक्ष तरीही दुसऱ्या पक्षाचे नेते फोडतात, हे श्रीमंत भिकाऱ्याचे लक्षण
आमच्याकडून आणि मनसेकडून जे नेते इतर पक्षात जात आहेत ते भटकेच आहेत. गिरीश महाजन स्वतः ला बाहुबली समजतात. पण नगर पालिका निवडणुकीत त्यांना फार मोठा फटका बसला. उत्तर महाराष्ट्रात त्यांना याच कारणामुळे यश मिळाले नाही. भाजप जगातला सर्वात मोठा पक्ष हा त्यांचा दावा आहे. त्यांची संपत्तीही अमाप आहे. पक्षाकडे १० हजार कोटींचा निधी आहे. तरीही त्यांना इतर पक्षाचे कार्यकर्ते नगरसेवक फोडावे लागतात, हे श्रीमंत भिकाऱ्याचं लक्षण आहे. श्रीमंत जेव्हा भिकारी होतो तेव्हा तो लाचार आणि लोचटपणे वागतो. गिरीश महाजन यांचा आजचा चेहरा बघता ते देखील लाचारीसारखेच वागले.
दाऊद इब्राहिम सारखी नवीन गँग महाजनांना निर्माण करायची आहे का?
त्यांच्याच पक्षातील लोक काही पक्षप्रवेशांसाठी विरोधक करताहेत. आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे पक्षप्रवेशांना विरोध करीत होत्या. रस्त्यावर उतरल्या होत्या. तरी कुणालाही न जुमानता महाजन लोक विकत घेतात, पक्षप्रवेश घडवून आणतात. हे राज्याच्या संस्कृती काळिमा फासण्यासारखे उद्योग आहेत. फडणवीस-मोदी राजकीय चारित्र्याच्या गप्पा मारतात. मग नाशिकमध्ये तुम्ही ज्यांच्यावर आरोप करीत होतात, ते सगळे आता तुमच्या पक्षातच कसे काय? दाऊद इब्राहिम सारखी नवीन गँग महाजनांना निर्माण करायची आहे का? असा बोचरा सवाल राऊत यांनी विचारला.
निर्लज्ज कुणाला म्हणायचे- जाणाऱ्यांना की प्रवेश देणाऱ्यांना?
ठाकरे बंधू यांची युती झाल्यावर दिनकर पाटील हे लाडू भरवत होते, गुलाल उधळत होते. परंतु नाचता नाचता तिकडे गेले, निर्लज्ज कुणाला म्हणायचे, जाणाऱ्यांना की प्रवेश देणाऱ्यांना? असा सवालही राऊत यांनी विचारले. विकाकासाठी जात असल्याचे दिनकर पाटील यांनी सांगितले. त्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पण भाजपमध्ये जाणार आहेत, कारण अमेरिकेचा पण विकास झाला नाही, असे म्हणत राऊतांनी गयारांना जोरात चिमटा काढला.
