शिवसेना पक्षामधील पक्षफुटीनंतर शिवसेना कुणाची, याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांनी दिला. तेव्हापासून शिवसेना पक्षाच्या खास करून संजय राऊत यांच्या निशाण्यावर नार्वेकर आहेत. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत नार्वेकर कुटुंब प्रतिस्पर्धी उमेदवाराला माघार घेण्यासाठी कसे अडचणीत आहेत, याविषयी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन सनसनाटी दावे केले होते. एकंदर नार्वेकर आणि राऊत यांच्यात कमालीचा संघर्ष आहे. असे असताना राऊत यांच्या हाताला नार्वेकरांच्या उपस्थित सुरू असलेल्या भांडणाचा व्हिडीओ लागला आहे.
advertisement
संजय राऊत यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत काय आहे?
संजय राऊत यांनी शेअर केलेल्या व्हिडीओतून दोन गटात जागेचा वाद सुरू असल्याचे दिसते. आतमध्ये शिरू नकोस, असे तुला सांगितले होते ना... आमच्या घरी साखरपुडा होता. तेव्हाही आणि आत्ताही आम्ही घरात नसताना तू आलासच कसा? आम्ही घरात नसताना संधी शिरून आतमध्ये शिरता का तुम्ही? आमची एवढी जागा गेली तरी.... फॉरेस्टमधील जागा किती काढली तुम्ही... असे एक महिला आणि एक पुरूष राहुल नार्वेकर यांना प्रश्न विचारीत आहे.
त्यावर भांडण करू नका, असे राहुल नार्वेकर दुसऱ्या गटाला सांगत आहेत. त्यावर भांडणाचा विषय नाही. आम्ही पद्धतशीर सांगतोय. आम्ही असताना काही केले असते तर वेगळी गोष्ट. आम्ही नसताना तुम्ही अशा गोष्टी करताच कशा... भांडणाचा विषयच नाही... चूक तुमचीच आहे... असे लोक राहुल नार्वेकर यांना म्हणत आहेत. दुसऱ्या गटातील लोक आक्रमक झालेले असताना राहुल नार्वेक यांनी काढता पाय घेतला.
राहुल नार्वेकरांनी पळ काढला, हाणामारी कुठे झाली, तुम्ही सांगताय की मी सांगू?
विधानसभा अध्यक्षांच्या उपस्थितीत हाणामारी कुठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला आहे! तुम्ही सांगताय की मी सांगू? असा प्रश्न संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांना उद्देशून विचारला आहे.
