Valentines Day 2026: वय वर्षे 75 अन् 50 वर्षांची साथ, पुणेरी आजी-आजोबांची जोडी लई जोरात, पाहा भन्नाट Love Story Video
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Valentines Day 2026: प्रेमाचे दिवस साजरे करणे चांगली गोष्ट आहे, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे एकमेकांना कायम समजून घेणे, एकमेकांच्या भावना आणि गरजा ओळखणे.
पुणे: व्हॅलेंटाईन डेचा उत्साह सध्या तरुणाईमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र काही वर्षांपूर्वी प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी होती. त्या काळात प्रेम हे शब्दांपेक्षा कृतीतून आणि नात्यांतील बांधिलकीतून व्यक्त केलं जात होतं. भावना उघडपणे मांडण्यापेक्षा नात्यांमध्ये टिकाव आणि जबाबदारीला अधिक महत्त्व दिलं जायचं.
आजची पिढी एकमेकांना भेटून, ओळख वाढवून, अनेक वर्ष डेटिंग केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेताना दिसते. तरीदेखील काही नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊन घटस्फोटाचं प्रमाण वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील एका 75 वर्षीय दांपत्याने आपले अनुभव सांगितले आहेत.
advertisement
पुण्यातील नारायण गोडसे आणि सुनंदा गोडसे यांनी सांगितलं की, “काही दिवसांपूर्वीच त्यांच्या लग्नाला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा पन्नास वर्षांचा प्रवास आम्ही एकमेकांना समजून घेत पार पाडला. आजकाल तरुणाई व्हॅलेंटाईन डे साजरा करते, याला आमचा विरोध नाही. परंतु साजरा करताना नात्यांचा सन्मान आणि मर्यादा जपल्या गेल्या पाहिजेत.”
“पूर्वी अशा प्रकारचे प्रेमदिन साजरे केले जात नव्हते. त्या काळात पालकांच्या संमतीनेच लग्न ठरत असत. आज मात्र तरुण-तरुणी स्वतःच्या पसंतीने लग्न करत आहेत. तरीदेखील घटस्फोटाचं प्रमाण वाढताना दिसत आहे. यामागे एकमेकांना पुरेसं समजून न घेणं आणि सतत इतरांशी तुलना करणं ही कारणं आहेत,” असं मतही गोडसे दांपत्याने व्यक्त केलं.
advertisement
सध्या नात्यांमध्ये समजूतदारपणा कमी
नारायण गोडसे यांनी सांगितलं की, “आजकाल तरुणाईत एकमेकांना समजून घेणं कमी झालं आहे. प्रत्येकाला स्वतःचा अहंकार महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे नात्यांमध्ये ताण-तणाव निर्माण होतो. तरुणाई व्हॅलेंटाईन डे उत्साहाने साजरे करतात. पण अनेकदा त्या दिवसापुरतेच नात्याचा गोडवा टिकतो. बर्याच वेळा गैरसमज किंवा संवादाची कमतरता नात्यांमध्ये अंतर आणते.”
“प्रेमाचे दिवस साजरे करणे चांगली गोष्ट आहे, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे एकमेकांना कायम समजून घेणे, एकमेकांच्या भावना आणि गरजा ओळखणे, आणि नात्यातील विश्वास वाढवणं आवश्यक आहे,” असंही ते सांगतात. खरे प्रेम आणि नात्याचा गोडवा फक्त एखाद्या दिवशी नाही, तर रोजच्या छोट्या कृतींनी टिकतो. त्यामुळे तरुणाईने या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 14, 2026 1:51 PM IST
मराठी बातम्या/लव स्टोरी/
Valentines Day 2026: वय वर्षे 75 अन् 50 वर्षांची साथ, पुणेरी आजी-आजोबांची जोडी लई जोरात, पाहा भन्नाट Love Story Video






