बीड येथील विशेष मकोका न्यायालयात मंगळवारी संतोष देशमुख हत्याप्रकरणी पुन्हा सुनावणी पार पडली. या सुनावणी वेळी पहिल्यांदाच वाल्मीक कराड बोलला. पण त्यानंतर कोर्टाने विचारलेल्या एका प्रश्नाने वाल्मीकची बोलती बंद झाली.
कोर्टात नेमकं काय घडलं?
मंगळवारी पार पडलेल्या सुनावणीत कोर्टाने आरोपींना काही प्रश्न विचारले होते. आपल्या विरोधात खंडणी मागणे, मारहाण करणे, अपहरण, हत्या केल्याने मकोका अंतर्गत गुन्हा दाखल आहे. तुमच्यावर असलेले आरोप मान्य आहेत का? असं कोर्टानं विचारलं होतं. यावर आरोपी वाल्मीक कराड आणि इतर आरोपींनी आपल्याला आरोप मान्य नसल्याचं सांगितलं.
advertisement
यावेळी वाल्मीक कराडने पहिल्यांदा कोर्टात बोलण्याचा प्रयत्न केला. कोर्टाच्या प्रश्नावर मला बोलायचं आहे, असं त्यानं म्हटलं. पण न्यायालयाने त्याला एकच प्रश्न केला. त्यानंतर वाल्मीकची बोलती बंद झाली. केवळ गुन्हा मान्य आहे की नाही? एवढंच बोला... असं कोर्टाने सांगितलं. यावेळी कोर्टानं वकील बदलण्याबाबत विचारणा केली असता सर्व आरोपींनी वकील बदलायचे आहेत, असं सांगितलं. तसेच प्रत्येकाने स्वतंत्र वकीलाची मागणी केली. सर्व आरोपींना व्हिसीद्वारे न्यायालयात हजर केलं होतं. विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम आणि अॅड. बाळासाहेब कोल्हे यांनी सरकारची बाजू मांडली.
न्यायालय आता गुन्ह्याचे रेकॉर्ड जेलमध्ये पाठवणार असून जेलमधून त्यावर आरोपर्णीच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातील. त्यानंतर पुन्हा खटल्याच्या कामकाजाला सुरूवात होणार आहे. या प्रकरणाचा पहिला साक्षीदार ८ जानेवारीला तपासला जाणार आहे. त्यानंतर इतर साक्षीदारांचे जबाब न्यायालयासमोर येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
