सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याचा जामीन अर्ज बीड येथील न्यायालयाने फेटाळला आहे. आरोपीला जामीन द्यावा अशी मागणी वकिलांनी केली होती, यावर सरकारी पक्षाने देखील युक्तिवाद केला होता दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर याबाबतचा निर्णय बीड येथील न्यायालयाने दिला आहे. आरोपीस जामीन मिळाल्यास साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो तसेच पुराव्यांशी छेडछाड देखील केली जाऊ शकते असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. याच कारणावरून विष्णू चाटे याचा जामीन अर्ज देखील फेटाळला आहे.
advertisement
नेमकं काय घडलं होतं?
या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज यापूर्वीच बीड येथील न्यायालयाने तसेच उच्च न्यायालयाने देखील फेटाळलेला आहे . विष्णू चाटे हा वाल्मिक कराड याचा मावसभाऊ लागत असल्याची माहिती आहे. संतोष देशमुखांचे अपहरण झाले, त्यावेळी धनंजय देशमुख यांच्याशी चाटेसोबत फोनवर बोलत होते. विष्णु चाटे त्यांना 15 मिनिटात सोडायला सांगतो असं सांगत होता. दोघांमध्ये असे जवळपास 35 फोन झाले होते. त्यानंतर देशमुखांना संपवल्यावर फोन बंद करून चाटे फरार झाला होता.
सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात 23 वी सुनावणी झाली. मागील सुनावणीत आरोपी विष्णू चाटेच्या जामीन अर्जावर युक्तिवाद झाला होता. तसेच संतोष देशमुखांच्या हत्येचे व्हिडीओ आरोपींच्या वकिलांना दिल्यानंतर सर्व आरोपींवर आज आरोप निश्चित करण्यात आले आहे.
आरोपींवर नेमके कोणते आरोप निश्चित केले?
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड , विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे , महेश केदार, जयराम चाटे यांच्यासह फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या विरोधात दोषारोप निश्चिती करण्यात आली आहे.खंडणी, अपहरण, हत्या, पुरावे नष्ट करणे, कट कारस्थान, संघटितपणे गुन्हेगारी कारवाई करणे आणि जातीवाचक शिवीगाळ, कंपनीचे नुकसान अशा विविध कलमाखाली दोषारोप निश्चित केले आहेत. यात पुढील सुनावणी 8 जानेवारी रोजी होणार आहे. यामुळे वाल्मिक कराड सर्व आरोपींना धक्का समजला जात आहे.
