महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरींच्या फाईलवर गटविकास अधिकाऱ्यांसह इतर वरिष्ठांच्या सह्या घेण्यासाठी लाच घेण्यात आली होती. कार्यारंभ आदेश मिळवून देण्यासाठी 70 हजार रुपयांची लाच स्वीकारताना तरनळीच्या सरपंचाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
सरपंच कसा अडकला?
महादेव प्रताप खेडकर (वय 35, रा. तरनळी, ता. केज, जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्या सरपंचाचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदार आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांच्या शेतजमिनीत नरेगा योजनेतून जलसिंचन विहीर मंजूर झाली होती. या विहिरींच्या प्रस्तावावर गटविकास अधिकारी आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन मंजुरी मिळवून देण्यासाठी आरोपी खेडकर याने प्रत्येकी 25 हजार रुपयांप्रमाणे 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
advertisement
लाच मागितल्यावर कुठे तक्रार करावी?
सरपंच खेडकर यांनी तक्रारदाराकडून 10 हजार आणि उर्वरित तिघांकडून प्रत्येकी 20 हजार असे एकूण 70 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. गावखेड्यातही आता लाचखोरीच्या घटना उघडकीस येऊ लागल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने अनेकांना धडकी भरली आहे. शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा असे आवाहन एसीबीकरून करण्यात आले आहे.
