या प्रकरणी आज पहाटे सातारा पोलिसांनी आरोपी प्रशांत बनकरला अटक केली. प्रशांत त्याच्या मित्राच्या फार्म हाऊसवर लपून बसला होता. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापेमारी करत प्रशांत बनकरला बेड्या ठोकल्या. या अटकेनंतर आता महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.
बनकरच्या कुटुंबीयाचे तरुणीवर आरोप
दरम्यान, प्रशांत बनकरच्या कुटुंबीयांनी डॉक्टर महिलेवरच आरोप केले आहेत. महिला डॉक्टर माझ्या भावाला टॉर्चर करत होती. ती ब्लॅकमेल करत होती, तिनेच १५ दिवसांपूर्वी माझ्या भावाला प्रपोज केलं होतं, असा खळबळजनक दावा प्रशांत बनकरच्या बहिणीने केला आहे. शिवाय माझा भाऊ पुण्यात जॉबला असतो, तो अधून मधून घरी येत असतो, त्याचा या प्रकरणाशी काही संबंध नाही, त्याला अडकवलं जात असल्याचं प्रशांतच्या भावाने म्हटलं आहे. दोघांनी न्यूज १८ लोकमतशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा दावा केला आहे.
advertisement
'माझ्या भावाला अडकवलं जातंय'- बनकरच्या भावाचा दावा
या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना आरोपी प्रशांत बनकरचा भाऊ म्हणाला, "डॉक्टरच माझ्या भावाला जास्त फोन करत होत्या. त्यांच्यात काय बोलणं व्हायचं, याचा तपास व्हायला पाहिजे. माझ्या भावाला अडकवलं जातंय, असं मला वाटतंय. तो घरी फार नसतो. तो अधून मधून येत असतो. आता दिवाळीला आला होता. त्यांच्यात काय चॅटींग व्हायचं. यातून कोण कुणाला जास्त त्रास देत होतं, याचा तपास व्हावा."
"तिनेच माझ्या भावाला प्रपोज केलं"
या घटनेबाबत अधिक माहिती देताना प्रशांतची बहीण म्हणाली की, "मयत डॉक्टर आम्हाला फॅमिली मेंबरसारख्या होत्या. आम्हाला बहिणीसारख्या होत्या. त्या नेहमी घरी यायच्या. आमच्याशी बोलायच्या. जॉबवर सुरू असलेल्या त्रासाबद्दल सांगायच्या. यातून त्यांना मानसिक त्रास सुरू असल्याचं दिसून यायचं. माझ्या भावाची आणि डॉक्टरची याच महिन्यात ओळख झाली होती. तिने १५ दिवसांपूर्वी भावाला प्रपोज केलं होतं. त्या माझ्या भावाला दादाही म्हणत होती. त्यामुळे माझ्या भावाने तिला समजावून सांगितलं होतं. त्यानंतर तो विषय तिथेच क्लोज झाला होता. दोघंही संपर्कात नव्हते."
"लक्ष्मीपूजनच्या दिवशी आम्ही एकत्र सण साजरा केला. यावेळी माझ्या भावाने डॉक्टरचे काही फोटो काढले होते. फोटो व्यवस्थित न आल्याने दोघांमध्ये किरकोळ वाद झाला होता. माझा भाऊ डॉक्टरवर ओरडला होता. पण त्यानंतर तो सॉरी बोलला होता. दरम्यान, माझ्या भावाचा मित्र आजारी असल्याने तो मित्राच्या घरी गेला होता. तेव्हा डॉक्टरने माझ्या भावाला कॉल वर कॉल केले. अनेकदा कॉल करून टॉर्चर केलं. तुम्हाला माझी काळजी नाही, असं म्हणत ती ब्लॅकमेल करत होती," असंही प्रशांत बनकरच्या बहिणीने म्हटलं आहे.
