दरम्यान, कोर्टात झालेला युक्तीवाद समोर आला आहे. आरोपी बदणेच्या वकिलांनी कोर्टात विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. यामुळे या प्रकरणाचं गूढ आणखी वाढत जाताना दिसत आहे. आरोपी बदणे याला या प्रकरणात गोवण्यात आलं आहे. त्याचा महिला डॉक्टरशी नक्की काय वाद होता? हेही बदणेच्या वकिलाने कोर्टात सांगितलं.
आरोपी गोपाल बदणेचे वकील कोर्टात काय म्हणाले?
advertisement
आरोपी गोपाळ बदणेचे वकील कोर्टात म्हणाले, "एफआयआरमधील नोंदी विरोधाभासी आहेत. दोन गुन्हे असताना एकच एफआरआय दाखल करण्यात आला आहे. सुसाईड नोटमध्ये अत्याचाराचा आणि छळवणूक केल्याचा उल्लेख प्रशांत बनकरच्या संबंधाने आहे. चार महिने त्यांच्यात लग्न करण्यावरून वाद सुरू होते."
"पीडित महिला आरोपी क्रमांक एकच्या (प्रशांत बनकर) घरी राहत होती. आत्महत्या करायला ती हॉटेलमध्ये का आली? तिला बाहेर जायला प्रवृत्त करण्यात आलं होतं का? हा प्रश्न अनुत्तरित आहे. आरोपी दोनला (गोपाळ बदने) बळीचा बकरा बनवण्यात आले आहे", असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलाने केला.
बदणेसोबत डॉक्टर तरुणीचा वाद काय होता?
गोपाळ बदनेच्या वकिलांनी न्यायालयात म्हटले की, "मयत डॉक्टरकडे पोलीस अटक केलेल्या आरोपीला वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन गेले होते. माझी ड्युटी असतानाच आरोपींना का आणता यावरून वाद झाले होते. २५ जून रोजी दोघांनी एकमेकांविरोधात तक्रारी केल्या होत्या. त्यावेळी बलात्काराची तक्रार केली गेली नाही."
"आरोपी एकमुळे (प्रशांत बनकर) आत्महत्येस प्रवृत्त झाल्याचं सुसाईडनोटमधून लक्षात येत आहे. पण, जाता जाता आरोपी दोनला अडकवण्याचा प्रयत्न म्हणून त्याचे नाव टाकण्यात आले आहे. संबंधित पीडितेला बलात्कार झाला असेल, तर त्याची वेळ ठिकाणं, सगळं नोंदवता आलं असतं; पण सुसाईड नोटमधील आरोप वेगळा आहे. सुसाईड नोटची सत्यताच प्रश्न निर्माण करणारी आहे. त्यामुळे मोबाईल जप्त करणे, गाडीसाठी एक दिवस पुरेसा आहे", असा युक्तिवाद गोपाळ बदनेच्या वकिलांनी केला.
त्यावर सरकारी वकील म्हणाल्या, "सुसाईड नोट ही डाईंग डिक्लेरेशन (मृत्यूपूर्वीचा खुलासा) असल्याने सत्यच समजण्यात येते. मरणारी व्यक्ती कधीही खोटं बोलत नाही. याबाबत सर्वोच्च न्यायालयानेही आदेश दिले आहेत. त्यामुळे यावर शंका घेणं आरोपीच्या वकिलांचा चुकीचा मुद्दा आहे." युक्तिवादानंतर न्यायालयाने बदनेला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
