सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथे एका व्यक्तीवर भरदिवसा गोळीबार करण्यात आला आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी हा गोळीबार केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, यामुळे शिरवळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गोळीबारात रियाज उर्फ मन्या इक्बाल शेख जखमी झाला आहे. हा गोळीबार जुन्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हल्लेखोरांचा शोध शिरवळ पोलीस घेत आहेत.
advertisement
खुनाचा बदला घेण्यासाठी गोळीबार?
मिळालेल्या माहितीनुसार, 2016 मध्ये प्रतीक चव्हाण याचा खून झाला होता. या प्रकरणात रियाज शेखला संशयित म्हणून अटक करण्यात आली होती. 2018 मध्ये तो जामिनावर बाहेर आला आणि सध्या वाई न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. याच खुनाचा बदला घेण्यासाठी रियाजवर हा गोळीबार झाल्याची चर्चा शिरवळमध्ये सुरू आहे. सुदैवाने, या गोळीबारात रियाज शेख किरकोळ जखमी झाला आहे.
पुण्यात आयुष कोमकर हत्या प्रकरणाची घटना घडली असताना, आता साताऱ्यातही खुनाचा बदला घेण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसत आहे. या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिरवळ पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.