विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका नामांकित अपार्टमेंटमध्ये शशिकांत मोरे हे सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहेत. मध्यरात्री दोनच्या सुमारास आरोपी प्रसाद व्हनपरके हा आपल्या भाच्यासह कारने सोसायटीत आला. मध्यरात्रीची वेळ असल्याने सुरक्षारक्षक मोरे यांना गेट उघडण्यास काही सेकंदांचा उशीर झाला. याच गोष्टीचा राग मनात धरून मामा-भाच्याने मोरे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
advertisement
छातीवर बसून केली मारहाण
हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपींनी शशिकांत मोरे यांच्या हातातील काठी हिसकावून घेतली आणि त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण करताना मोरे यांना खाली पाडून थेट त्यांच्या छातीवर बसून बुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यामुळे मोरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही सर्व घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यातील दृश्ये अंगावर काटा आणणारी आहेत.
मामा- भाच्याविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी पीडित सुरक्षारक्षक शशिकांत मोरे यांच्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलिसांनी तात्काळ दखल घेतली आहे. मुख्य आरोपी प्रसाद व्हनपरके आणि त्याच्या भाच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 118 (1), 115(2), 352 आणि 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या नागरिकांकडून अशा प्रकारची वर्तणूक होत असल्याने सोलापूरकरांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
