मुंबई : नागपूर–गोवा शक्तिपीठ महामार्गाला राज्यातील काही जिल्ह्यांतून वाढता विरोध पाहता राज्य शासनाने या महामार्गाच्या मार्गरेषेत बदल करण्याची घोषणा केली आहे. विशेषतः सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्याने या प्रकल्पाचा नवा आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र अंतिम अलाइन्मेंट जाहीर होण्यापूर्वीच विविध अफवा पसरल्याने संबंधित जिल्ह्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, काही ठिकाणी समर्थन तर काही ठिकाणी उघड विरोध सुरू झाला आहे.
advertisement
शक्तिपीठ महामार्गाच्या मूळ प्रस्तावाला सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत शेतकरी व स्थानिक नागरिकांचा मोठा विरोध होता. बागायती शेती, पाण्याचे स्रोत आणि गावांचे विभाजन होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच जाहीर घोषणा करत धाराशिव जिल्ह्यापासून महामार्गाची नव्याने आखणी केली जाईल, असे सांगितले. तसेच हा नवा मार्ग सांगली जिल्ह्यातील आटपाडी परिसरातून पुढे जाऊन चंदगडकडे वळवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तर 4 तालुके वगळले जाणार
मात्र प्रत्यक्षात या मार्गाबाबत रोज नवनव्या चर्चा आणि अफवा समोर येत आहेत. काही माहितीप्रमाणे तुळजापूर–शिंगणापूर प्रस्तावित महामार्गाचा समावेश शक्तिपीठ महामार्गात करण्यात आला असून, हा मार्ग तुळजापूरहून करकंब, शिखर शिंगणापूर मार्गे सातारा जिल्ह्याकडे वळवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. असे झाल्यास सांगली जिल्हा पूर्णपणे वगळला जाण्याची शक्यता असून, सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर आणि सांगोला हे चार तालुके या महामार्गाबाहेर पडू शकतात. त्याऐवजी माढा आणि माळशिरस या तालुक्यांचा नव्या मार्गात समावेश होण्याची चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर शक्तिपीठ महामार्गाविरोधात आंदोलनही अधिक तीव्र होत आहे. बार्शी तालुका शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आज बुधवारी (ता. ७) बार्शी तालुक्यातील रुई (भालगाव) येथे राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता होणाऱ्या या मेळाव्यास दहा जिल्ह्यांतील बाधित शेतकरी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, महामार्गाच्या मार्गबदलाबाबत काही भागांत स्वागत तर काही ठिकाणी तीव्र विरोध दिसून येत आहे. करकंब परिसरातील नागरिकांनी प्रस्तावित बदलाचे सुरुवातीलाच स्वागत केल्याचे चित्र आहे. मात्र वैराग परिसरात हा महामार्ग वैराग–माढा मार्गे जाणार असल्याच्या चर्चांमुळे अस्वस्थता पसरली असून, “कोणीही जमीन विकू नये” असे आवाहन करणाऱ्या पोस्ट समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
पूर्वीच्या प्रस्तावित मार्गात बार्शी, मोहोळ आणि पंढरपूर तालुक्यांतील मोठ्या प्रमाणावर बागायती शेती बाधित होत होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष वाढला होता. आता नवा मार्ग नेमका कोणत्या गावांमधून जाणार, कोणत्या जमिनी बाधित होणार, हे सर्व राजपत्र प्रसिद्ध झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे
