राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता
शरद लाड हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य असून त्यांचा सांगली जिल्ह्यातील राजकारणावर प्रभाव आहे. ते क्रांती अग्रणी जी. डी. बापू लाड यांचे नातू आहेत. त्यामुळे लाड घराण्याचा वारसा असलेल्या राजकीय परंपरेला आता भाजपची जोड मिळणार आहे. यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
advertisement
भाजपमध्ये होणाऱ्या या प्रवेशामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. सांगली जिल्हा हा जयंत पाटलांचा बालेकिल्ला समजला जातो. या जिल्ह्यात पाटील गटाचे मोठे वर्चस्व असून, गेल्या अनेक निवडणुकांत त्यांनी स्थानिक पातळीवर आपली ताकद दाखवून दिली आहे. मात्र लाड घराण्यातील शरद लाड यांनी भाजपकडे झुकते माप दिल्याने आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या गोटात चिंता वाढली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा मोठा डाव
लाड घराणे हे पवार गटाचे निष्ठावान समजले जात होते. आमदार अरुण लाड हे सध्या शरद पवार गटाचे आमदार असून, त्यांचा मुलगा भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सांगली जिल्ह्यात भाजप आपला पाया मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. शरद लाड यांच्या प्रवेशामुळे भाजपला स्थानिक स्तरावर बळकटी मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने घेतलेली ही चाल महत्त्वाची ठरणार असून, राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी मात्र हा मोठा धक्का ठरण्याची शक्यता आहे.