पुणे : सध्या राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सर्वच प्रमुख पक्ष राज्यात जोमात प्रचार करत आहेत. दुसरीकडे विजयाचे शिखर गाठण्यासाठी सध्या युती आणि आघाड्याचे गणित जुळवले जात आहे. मुंबई, पणे, ठाणे, पिंपरी चिंचवड या महानरपालिकांत काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. विशेष म्हणजे या प्रमुख महापालिकांसाठी युतीची नवी समीकरणं उदयास येत आहेत.एकीकडे मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत .तर दुसरीकडे पुण्यात शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान आता राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि शरद पावर गटाबाबत मोठी माहिती समोर येत आहे.
advertisement
पुण्यात अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आगामी महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येण्याच्या चर्चा सुरु आहेत. या युतीला सुरुवातीपासून विरोध असलेले शरद पवारांच्या पक्षाचे पुणे शहर प्रमुख प्रशांत जगताप यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव पक्षाकडे पाठवला आहे. कालच शरद पवारांनी जगताप यांना मुंबईमध्ये भेटण्यासाठी बोलावलं होतं. दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीला प्रशांत जगताप यांचा विरोध आहे. कोणत्याही परिस्थितीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार नाही. तर दुसरीकडे प्रशांत जगताप दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला विरोध करत असताना दुसरीकडे मात्र वरिष्ठ पातळीवर नेते मात्र आघाडीच्या चर्चांना अंतिम स्वरूप देताना पाहायला मिळाले. खासदार सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मधील वरिष्ठ नेते या आघाडीला सकारात्मक असल्याचे देखील समोर आलं आहे.
शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याचे निमित्त काय?
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चांना उधाण आले असताना दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकाच मंचावर येणार आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्व साधारण सभेला दोन्ही नेते एकत्रित येणार आहे. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे 29 डिसेंबर म्हणजे सोमवारी पार पडणार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्व साधारण सभा पार पडणार आहे. साखर उद्योगातील सर्वोत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कार कार्यक्रमासाठी दोन्ही पवार एकत्रीत येणार आहे.
दुरावलेले पवार काका-पुतणे राजकारणात एकत्र येणार?
गेल्यावेळी आयोजित केलेल्या सभेत अजित पवारांनी शरद पवार यांच्याशेजारी बसणे टाळले होते. त्यामुळे एकीकडे युतीच्या चर्चा होत असताना शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत असल्याने सभेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. महापालिका निवडणुकीत्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रात राजकीय मनोमिलनाचे वारे जोरदार वाहू लागलेत. उद्धव आणि राज ठाकरेंची युती झाली असतानाच, दुरावलेले पवार काका-पुतणे देखील एकत्र येणार का याची देखील जोरदार चर्चा सुरू आहे.
