बारामती : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपायला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. बारामतीच्या लढतीकडे फक्त महाराष्ट्राच नाही तर देशाचं लक्ष लागलं आहे, कारण या मतदारसंघात पवार काका विरुद्ध पुतण्या असा सामना रंगत आहे. अजित पवार यांच्याविरुद्ध युगेंद्र पवार बारामतीच्या रिंगणात उतरले आहेत. युगेंद्र पवार यांचा प्रचार करण्यासाठी शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवारही मैदानात उतरल्या आहेत.
advertisement
प्रतिभा पवार यांची गाडी बारामती टेक्सटाईल पार्कच्या बाहेर अडवल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. सुरक्षारक्षकाने आमची गाडी अडवल्याचा व्हिडिओ प्रतिभा पवार यांच्याकडून दाखवण्यात आला. दरम्यान टेक्सटाईल पार्कच्या व्यवस्थापकीय संचालकाने त्यांचा दावा खोडून काढला आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा आहेत.
टेक्सटाईल पार्कमध्ये प्रतिभा पवारांचा प्रचार
बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये प्रतिभा पवार यांनी युगेंद्र पवार यांच्यासाठी प्रचार केला. तुम्ही इथे खूश आहात का? असा प्रश्न प्रतिभा पवार यांनी टेक्सटाईल पार्कमधल्या कामगारांना विचारला, तेव्हा या कामगारांनी हो असं उत्तर दिलं.
'महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे, पण ते तुमच्या मदतीशिवाय नाही ना. तुतारीला मत देऊन भरपूर मतांनी निवडून द्यायचं. युगेंद्र पवार तुमचा उमेदवार आहे, माहिती आहे ना? तुतारीला मत द्या, एवढंच सांगायला मी आले आहे', असं म्हणत युगेंद्र पवार यांना मत देण्याचं आवाहन प्रतिभा पवार यांनी केलं.
सीईओंचं स्पष्टीकरण
टेक्सटाईल पार्कमध्ये रॅली काढण्यात येणार आहे, असं मला समजलं. पार्कमध्ये रॅली काढायला परवानगी नाही, त्यामुळे मी सुरक्षारक्षकाला गेट बंद करायला सांगितलं. पण त्या खरेदीला आल्या आहेत, असं समजलं त्यावेळी काही मिनिटांमध्येच त्यांना आत सोडण्यात आलं, असं स्पष्टीकरण टेक्सटाईल पार्कचे सीईओ अनिल वाघ यांनी दिलं आहे.
