अंकुश कडू असं हत्या झालेल्या शिवसेना नेत्याचं नाव आहे. ते नागपूरचे माजी उपजिल्हाप्रमुख होते. शनिवारी सायंकाळी नारी रोड माडा चौक परिसरात दुचाकी अडवून त्यांची हत्या करण्यात आली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मयत अंकुश कडू हे आपल्या पांढऱ्या रंगाच्या स्कूटीवरून जाताना दिसत आहेत. दरम्यान, नारी रोड माडा चौक परिसरात आले असता, एका तरुणाने त्यांची स्कूटी अडवली. त्यांच्याशी हुज्जत घालत, त्यांना स्कूटीवरून बाजुला पाडलं. एका आरोपीनं अंकुश यांना पकडल्यानंतर त्याच परिसरात दबा धरुन बसलेले इतर हल्लेखोर बाहेर आले. त्यांनी अंकुश यांच्या दिशेनं धाव घेत, धारदार शस्त्राने सपासप वार केले.
advertisement
भररस्त्यात हा खून होत असताना आसपास लोकांची वर्दळ होती. गाड्या ये जा करत होत्या. मात्र कुणीही अंकुश यांना वाचवण्यासाठी आलं नाही. अवघ्या काही सेकंदात आरोपींनी ३० हून अधिक वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की अंकुश कडू हे जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडले. यातच त्यांचा मृत्यू झाला. हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणातून झाला? याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र जुन्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.
