नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरच्या सोनिवली परिसरात रात्री १० वाजेच्या सुमारास एका सार्वजनिक ठिकाणी गणपतीच्या पूजेचे आयोजन करण्यात आले होते. या पूजेनिमित्त नगरसेवक हेमंत चतुरे दर्शनासाठी गेले होते. यावेळी भाजपचे पदाधिकारी बंटी म्हसकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चतुरे यांचा वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी चतुरे यांना गंभीर मारहाण केल्याचा आरोप शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
advertisement
रुग्णालयात पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी
या हल्ल्यात हेमंत चतुरे जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच शिंदेसेनेच्या स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती. यावेळी भाजपविरोधात संताप व्यक्त करण्यात आला आहे.
खरं तर, बदलापूरमध्ये शिंदेसेना आणि भाजप यांच्यातील शीतयुद्ध गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र, या ताज्या घटनेमुळे या वादाला आता हिंसक वळण लागले आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल केल्याची कोणतीही माहिती समोर आली नाही. राज्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती असताना स्थानिक पातळीवर अशाप्रकारे वाद होत असल्याने पक्षनेतृत्वाची डोकेदुखी वाढली आहे.
