सिंधुदुर्ग : ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर कोकणवासियांची गैरसोय होणार आहे. मुंबई ते चीपी सिंधुदुर्ग विमानसेवा शनिवार २६ ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. कोकणवासियांसाठी आणि पर्यटकांसाठी सोयीची असणारी ही विमानसेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. सिंधुदुर्गवासियांना यामुळे मोठा धक्का बसला आहे. मुंबईहून तळकोकणात जाण्यासाठी चिपी इथं विमानतळ उभारले, याला कोकणवासियांचा प्रतिसादही लाभला होता.
advertisement
मुंबई ते चीपी विमानसेवा अनियमित असल्यानं टीकेचा धनीही बनली होती. गेल्या तीन वर्षांपासून मुंबई ते चीपी आणि चीपी ते मुंबई अशी विमानसेवा सुरू आहे. २६ ऑक्टोबरपासून मुंबई ते चिपी ही विमानसेवा बंद होत आहे. त्यामुळे कोकणवासीयांचे विमानातून आरामात आपले गाव गाठण्याचे स्वप्न पुन्हा एकदा अधुरेच राहणार आहे.
सिंधुदुर्गातील विमानतळावरून ९ ऑक्टोबर २०२१ पासून 'चिपी' व्यावसायिक उड्डाणे सुरू झाली होती. आता पर्यटन हंगामाला प्रारंभ झालेला असतानाच अचानक सिंधुदुर्ग- मुंबई विमानसेवा २६ ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. ही सेवा तीन वर्षांसाठी करार पद्धतीने सुरू केली होती. ही मुदत येत्या २६ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. त्यामुळे या प्रवासाची २६ तारखेपासूनची तिकीट विक्री बंद आहे. दरम्यान याच चीपी विमानतळावरून फ्लाय 91 कंपनीची पुणे - सिंधुदुर्ग - हैदराबाद आणि बेंगलोर ची सेवा सुरू आहे.
