खून करून पुरावे नष्ट
उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी अक्षयचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याला 'एमएच-३०' नावाच्या हॉटेलवर जेवणाच्या बहाण्याने बोलावलं होतं. अक्षय हॉटेलवर पोहोचताच आरोपींनी त्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. यानंतर अक्षयला काही कळायच्या आत त्याच्या धारदार शस्त्राने हल्ला केला. हा हल्ला इतका भयंकर होता की त्याचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी त्याचा मृतदेह मोरगाव भाकरे येथील शेतातील एका शेडमध्ये नेऊन जाळला. हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी मृतदेह जाळल्यानंतर उर्वरित राखही स्वच्छ केली आणि शेड धुऊन त्यावर रंगही मारला, जेणेकरून खुनाचा कोणताही पुरावा शिल्लक राहणार नाही.
४८ तासांत गुन्ह्याचा छडा; सहा पथकांची मोहीम
या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि डाबकी रोड पोलिसांचा समावेश असलेली सहा विशेष पथके कार्यरत करण्यात आली होती. तांत्रिक पुरावे, मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत या गुन्ह्याचा छडा लावला. तपासादरम्यान संशयित चंद्रकांत बोरकर याला ताब्यात घेण्यात आले. कसून चौकशी केल्यावर त्याने संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली.
मुख्य आरोपी कुख्यात गुन्हेगार
तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी चंद्रकांत बोरकर हा कुख्यात गुन्हेगार आहे. जवळपास दोन दशकांपूर्वीच्या एका सेक्स स्कॅन्डल प्रकरणातही त्याचा सहभाग होता. गुन्हा करून पुरावे नष्ट करून स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होण्याची त्याची सवय असल्याचं पोलिसांनी नमूद केले आहे. काही दिवसांपूर्वी अक्षय आणि बोरकर यांच्यात वाद झाला होता, याच वादातून सूड घेण्यासाठी बोरकरने अक्षयच्या हत्येचा कट रचल्याची माहिती आहे.
अक्षयच्या आईकडून तक्रार, तपास वेगाने
२३ ऑक्टोबर रोजी अक्षयची आई शिला विनायक नागलकर यांनी डाबकी रोड पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अक्षय घरातून बाहेर पडला आणि तो परतला नाही, असे त्यांनी तक्रारीत नमूद केले होते. यानंतर पोलिसांनी तातडीने तपास आणि शोधमोहीम सुरू केली. या गुन्ह्यात पोलिसांनी चंद्रकांत महादेव बोरकर (मुख्य आरोपी), अशोक उर्फ ब्रह्मा पांडुरंग भाकरे, कृष्णा वासुदेव भाकरे आणि आशु उर्फ आशिष शिवकुमार वानखडे या चौघांना अटक केली. मात्र, रोहित पराते, शिवा माळी, आकाश शिंदे आणि अमोल उन्हाळे हे चार आरोपी अद्याप फरार आहेत. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकेरवाना झाली आहेत.
