उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी पुणे दौऱ्यावर आहेत. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांसोबत बैठका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने अजित पवार कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. बुधवारी अगदी सकाळीच अजित पवार पक्ष कार्यालयात दाखल झाले. यावेळी त्यांच्या भेटीसाठी धवलसिंह मोहिते पाटील यांनी कुटुंबियांसह त्यांची भेट घेतली.
advertisement
ढासळलेला गड सावरण्यासाठी अजितदादांचा मोर्चा सोलापूरकडे
सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने तसेच माजी आमदार बबन शिंदे यांच्या दोन्ही सुपुत्रांनी भाजप प्रवेश केल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा हादरा बसला. माजी आमदारांना थोपविण्यासाठी अजित पवार यांनी खूप प्रयत्न केले. परंतु भाजपने 'ऑपरेशन घड्याळ' राबवून माजी आमदारांना गळाला लावून अजित पवार यांना जोरदार दणका दिला. जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार काहीसे बॅकफूटला गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आता अकलूजचे धवलसिंह मोहिते पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
अकलूजचे धवलसिंह मोहिते पाटील अजित पवार यांच्या भेटीला
धवलसिंह मोहिते पाटील हे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे चुलत बंधू आहेत. धवलसिंह मोहिते पाटील हे काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष होते. विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी पक्षाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. मध्यंतरी काहीसे मौनव्रतात गेलेले धवलसिंह मोहिते पाटील यांनी निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांची भेट घेतल्याने भविष्यकाळातली राजकीय संधी पाहून ते आपल्या मनगटावर घड्याळ बांधणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
