ही घटना सोलापूरातील जुळे येथे घडली आहे. शिवशरण भुताळी तळकोटी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. तो इयत्ता अकरावीत शिकत होता. तीन महिन्यांपूर्वी शिवशरणच्या आईचं कावीळमुळे निधन झालं होतं. आईच्या मृत्यूचा शिवशरणला मोठा धक्का बसला होता. आईचा विरह जिव्हारी लागल्याने शिवशरणने टोकाचं पाऊल उचललं आहे. त्याने मामाला उद्देशून लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
advertisement
शिवशरण याला दहावीत 92 टक्के मिळाले होते. नीटचा अभ्यास करून त्याला डॉक्टर व्हायचं होतं. पण कावीळ आजारामुळे आईचं तीन महिन्यापूर्वी दुःखद निधन झालं. त्यानंतर शिवशरण हा मानसिक तणावाखाली गेला. वडील एका खासगी संस्थेत कमी मानधनावर काम करत होते. त्यामुळे मामा महादेव तोळनुरे यांनी कोंढवा येथून सोलापुरात कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीसाठी प्रवेश घेतला होता. मात्र आईच्या जाण्यामुळे त्याला जबर मानसिक धक्का बसला होता. मामा आणि आजीकडे बघून शिवशरण याने जगण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी त्याने हार मानत आत्महत्येचा निर्णय घेतला.
मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत शिवशरण म्हणाला, 'मी शिवशरण. मी मरत आहे. कारण मला जगण्याची इच्छा नाही. माझी आई गेली, तेव्हाच जायला पाहिजे होते. पण मी मामा आणि आजीचं तोंड बघून जिवंत होतो. माझ्या मरण्याचे कारण म्हणजे, आई काल स्वप्नात आली होती. 'तू जास्त तणावात का आहेस ? माझ्याकडे ये..' असे म्हणत तिने मला बोलावले. त्यामुळे मी मरण्याचा विचार केला. मी मामाचे व आजीचे खूप आभार मानतो, कारण त्यांनी मला खूप सपोर्ट केला. माझे लाड पुरवले. मामा.... मी मरत आहे. मी गेल्यावर माझ्या बहिणीला सुखात ठेव. मी कुठेही जाणार नाही. परत येणार आहे, वाट पाहा. मामा, मला तुला एक सांगायचं आहे. आजीला पप्पाकडे पाठवू नको. सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. तू मला आईबाबांपेक्षा जास्त सांभाळलं, त्याबद्दल धन्यवाद.... माझ्या मृत्यूला मीच जबाबदार आहे, तुमचा पिंट्या.