गोंदिया : एकीकडे परीक्षेच्या नावाने बोंब ठोकाणाऱ्या किंवा परीक्षा म्हटल्यावर नाकं मुरडणाऱ्यांची संख्या मोठी असली तरी कोणत्याही संकटकाळी मोठ्या धैर्याने परीक्षेला सामोरं जाण्याची ताकद दाखवणारे विद्यार्थीही कमी नाहीत. गोंदियाच्या एका विद्यार्थिनीच्या धैर्य आणि धाडसाचं म्हणूनच कौतुक केले जात आहे. दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू असतानाच वडिलांचा अचानक मृत्यू झाला. वडिलांच्या जाण्याचे अपार दु:ख अन् दुसरीकडे बोर्डाची परीक्षा! डोळ्यात आसवांचा पूर घेऊन खिन्नपणे अखेर घरी वडिलांचा मृतदेह ठेवून तो परीक्षा केंद्रावर गेला. पेपर सोडवून आल्यावर प्रेताला अग्नी दिला.
advertisement
बोर्डाच्या पेपरचे मानसिक दडपण असतानाच पेपर सुरु होण्यास काही तासाचा आवधी असताना गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार येथील आदेश कटरे याने दहावीचा पेपर दिला आहे. इयत्ता दहावीमध्ये असलेल्या आदेशचा आज मराठी विषयाचा पेपर होता. पेपरचे मानसिक दडपण असतानाच त्याचे वडील ठानेश्वर कटरे यांचा आज पहाटे आकस्मिक निधन झाला. वडिलांचा मृतदेह दारात असताना परीक्षेला जावे तरी कसे? असा सवाल त्याच्या मनात घोळत होता. मात्र, पेपरच्या गैरहजरीने पूर्ण शैक्षणिक वर्ष वाया जाणार यामुळे आदेशने मन घट्ट करुन वडिलांचा मृतदेह दारात असताना पेपर देण्याचा निर्णय घेतला. पेपर सुटल्यानंतर मग त्याने वडिलांवर अंत्यसंस्कार केले.
काळजावर दगड ठेवून पेपर लिहिला
आदेश ठाणेश्वर कटरेच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आदेश सध्या शिक्षण घेत आहे. त्यात कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तरीही आदेशने काळजावर दगड ठेवून सकाळी 11 वाजता दहावीच्या पेपरला हजर राहिला आणि एका तासात पेपर देऊन घरी परतला. एकीकडे पेपर देण्यास टाळाटाळ करणारे विद्यार्थी आहेत, पेपर अवघड गेला अशी कारणे देणारी आहेत, अभ्यास नाही झाला तर जीवाचं बर वाईट करणारे विद्यार्थी आहेत, तर दुसरीकडे वडिलांचं पार्थिव घरी सोडून परीक्षा द्यायला येणारा आदेश आहे. आपल्या गावातील मुलाच्या वडिलांचे निधन झाले आहे, त्याचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून आदेशच्या परीक्षा केंद्रावर गावकरी त्याच्यासोबत गेले.त्याला धीर देऊन पेपर देण्यासाठी प्रोत्साहन दिले. वडिलांचे निधन झाल्यानंतरही आयुष्यात न थांबता आदेश दहावीचा पेपर देऊन आपल्या सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे