कोवाड: कोल्हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चंदगड तालुक्यात भर दिवसा चोरीची घटना घडली आहे. आचारपणाच्या उपचारासाठी गेलेल्या वृद्ध दाम्पत्याच्या घरावर चोरांनी डल्ला मारला. चोरांनी घरातून सोन्या चांदीच्या दागिन्यासह घरातील साहित्यही चोरून नेलं. उतार वयात घर चालवणाऱ्या कुटुंबाच्या घरात चोरी झाल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदवड तालुक्यातील कोवाड इथं नेसरी रोडवरील कला महाविद्यालयाजवळ राहणाऱ्या एका ६६ वर्षीय वृद्धाच्या बंद घराचा कडा तोडून चोरांनी घरातील सर्व संसारच लंपास केला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे स्वतःच्या वैद्यकीय तपासणी आणि उपचारासाठी मुलाकडे गेले होते, त्यावेळी ही घटना घडली. चोरांनी केवळ सोन्या-नाण्यावरच नव्हे, तर सॅमसंग टीव्ही, फ्रिज, गॅस शेगडी, आटा चक्की आणि अगदी खाण्याच्या डाळी आणि अंघोळीचे साबणही सोडले नाहीत.
advertisement
नेमकं काय घडलं?
सतबा रामा हेब्बाळकर (वय ६६) हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. आपल्या प्रकृतीची तपासणी आणि पुढील उपचारासाठी ते आपल्या मुलाकडे गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारला. चोरांनी या चोरीत संतापजनक कृत्य केलं. सोन्या चांदीच्या दागिन्यासह संपूर्ण घर साफ केलं. चोरांनी घरातून सॅमसंग (Samsung) कंपनीचा टेलिव्हिजन, एलजी (LG) कंपनीचा फ्रिज, वाय-फाय (Wi-Fi) राउटर, नवीन मिक्सर आणि इलेक्ट्रिक एक्स्टेंशन बोर्ड सुद्धा चोरून नेले.
एवढंच नाहीतर दोन एचपी (HP) गॅस सिलिंडर, गॅस शेगडी, बेड-कम-सोफा, धनलक्ष्मी कंपनीची आटा चक्की आणि कपाटातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने, तांब्याची मोठी भांडीही चोरून नेली. चोरांना हेच कमी पडलं की, म्हणून घरातील नवीन ब्लँकेट, नवीन टॉवेल, विविध प्रकारचे कपडे (ड्रेस), अगदी वापरायचे साबण आणि स्वयंपाकघरातील भांडी सुद्धा चोरले.
डाळी आणि सुकामेवाही साफ
कहर म्हणजे, फ्रिजमधील डाळी आणि सुका मेवा हे सुद्धा चोरांनी सोडलं नाही. विशेष म्हणजे, चोरांनी केवळ एलजी (LG) फ्रिज चोरला नाही, तर त्या फ्रिजमध्ये आणि त्याच्या खालील कप्प्यात साठवून ठेवलेल्या डाळी, सुका मेवा आणि इतर सर्व अन्नपदार्थही सोबत नेले आहेत.
जेव्हा हेब्बाळकर कुटुंबीय उपचार घेऊन घरी परतले, तेव्हा त्यांना घराचा दरवाजा तुटलेला आणि संपूर्ण घर रिकामं झालेलं दिसलं. या धाडसी चोरीमुळे कोवाड परिसरात भीतीचे वातावरण पसरलं आहे. चंदगड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे. आजारपणात उपचारासाठी गेलेल्या वृद्धाचा अशा प्रकारे संसारच चोरीला गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
