माजी नगरसेवक उमेश बोरगावकर, ज्ञानेश्वर सपाट आणि ओंकार सपाट असं हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावं आहेत. मध्यरात्री झालेल्या या घटनेमुळे कल्याण परिसरात मोठी खळबळ उडाली असून महात्मा फुले पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.
भांडण सोडवून जाताना हल्ला
या हल्ल्याबद्दल माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांनी सांगितलं की, "माझ्या कार्यालयासमोर गौरी संकुल आहे. इथं आमचे जवळचे मित्र नाना सपाट आणि त्यांच्या मुलाचा काही लोकांसोबत वाद झाला होता. गेटवरती त्यांच्यात मारहाण सुरू होती. मी तातडीने ऑफिसातून बाहेर येऊन त्यांचे भांडण सोडवले. या मारहाणीत नाना सपाट यांचा मुलगा ओंकार सपाट याच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्याचा आणि पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला मी त्यांना दिला. ओंकारला रुग्णालयात घेऊन जात असताना अचानकही चारही बाजुंनी काही अज्ञातांनी माझ्या कारला घेरलं आणि दगडाने हल्ला केला."
advertisement
गाडीवर दगडफेक, काचा फोडल्या
या हल्ल्यात गाडीच्या पुढील आणि मागील बाजूच्या काचेच्या खिडक्यांचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. गाडीतील सीटवर सर्व काचा विखुरल्या. हल्लेखोर गाडीतील त्या दोन जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. या हल्ल्यात माझ्यावरही हल्ला करण्यात आला, असे बोरगावकर यांनी स्पष्ट केले.
दोन व्यक्ती जखमी, पोलीस तपास सुरू
गाडीवर झालेल्या या भयंकर दगडफेकीत माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यासह ज्ञानेश्वर सपाट आणि ओंकार सपाट हे जखमी झाले आहेत. रात्री उशिरा एका राजकीय व्यक्तीवर झालेल्या या हल्ल्यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या गंभीर गुन्ह्याची नोंद कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.