उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी बुधवारी राजधानी दिल्लीचा पहिलाच दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत सुनील तटकरे, प्रफुल पटेल हे सुनेत्रा पवार यांच्यासोबत होते. या गाठीभेटीनंतर सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोदी-शहांची भेट, विलिनीकरणाची चर्चा तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद अशा अनेक विषयांवर भाष्य केले.
advertisement
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचे काय?
आजच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. विलिनीकरणासंदर्भात आमच्या भूमिकेचा प्रश्न येतो कुठे? याधीही मी विचारले आहे की कोणता पक्ष कोणत्या विलीन करायचा आहे? माझा सरळ प्रश्न आहे ज्यांना विलिनीकरण हवे आहे ते भाजपसोबत येणार आहेत का? असे विचारीत अजित पवार यांना भाजपसोबत राहून बहुजन समाजाचे हित साधायचे होते, अशी आठवण तटकरे यांनी करून दिली. जर भाजपसोबत येण्याची भूमिका शरद पवार आणि त्यांच्या पक्षाने घेतली तर तुम्हाला मान्य असेल का यावर जर तरच्या प्रश्नांवर मी उत्तर देणार नाही, असे तटकरे म्हणाले.
मोदी-शाहांच्या भेटीवर तटकरे म्हणाले
शपथविधी झाल्यानंतर मोदी-शाहांसोबत ही पहिलीच भेट होती. त्यांनी संवेदना व्यक्त केल्या. आम्ही सोबत आहोत, असे त्यांनी वहिनींना आश्वस्त केले. पक्ष, संघटना आणि राज्याच्या व्यापक हितासाठी सोबत असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्र सरकार राज्याच्या पाठीशी आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्याचे तटकरे यांनी सांगितले.
सुनेत्रा पवारांनी राज्यसभेचा राजीनामा दिलाय का?
सुनेत्रा पवारांनी राज्यसभेचा राजीनामा दिला नाही. कुठल्याही व्यक्तीला देशाचा किंवा राज्याचा मंत्री होताना विधिमंडळाचा किंवा संसदेचा सदस्य व्हायला सहा महिने अवधी असतो. अशा वेळी जेव्हा एखादे पद असते तेव्हा ते ठेवता येते. अजित पवारांच्या बाबतीत ९१ साली असे झाले होते, असे तटकरे यांनी सांगितले.
दादांच्या अपघाताच्या चौकशीवर काय वाटते?
अजितदादा हे विकासाची दृष्टी असलेले नेते होते. त्यांच्या निधनाचे दुःख सर्वांना आहे. चौकशी सुरू आहे. सत्य समोर येईल. किंबहुना त्यांच्या अपघातासंदर्भात चौकशी होऊन राज्याचे समोर सत्य आले पाहिजे, अशी पक्षाची भूमिका असल्याचे तटकरे म्हणाले.
