पुरंदर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या विमानतळासाठी तेथील जमिनींचा सरकारकडून सर्व्हे होत आहे. मात्र, या सर्व्हेला बाधित गावातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. यादरम्यान पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये संघर्ष झाला. यावेळी पोलिसांनी लाठीहल्ला केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. सोमवारी सुप्रिया सुळे यांनी कुंभारवळण गावाला भेट दिली. तेथील परिस्थिती आणि नागरिकांचे म्हणणे सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना सांगितले.
advertisement
सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्यावेळी तेथील काही गावकऱ्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर आरोप केला. प्रस्तावित पुरंदर विमानतळाच्या आजूबाजूला तुमची १२० एकर जमीन आहे, असे काहीजण म्हणाले. त्यावर सुप्रिया सुळे यांनी अतिशय शांतपणे स्मितहास्य करीत आरोप करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले.
आता सर्व डिजिटल, कुणीही जाऊन चेक करा, जर खरं निघालं तर...
आता सर्व डिजिटल आहे. तलाठ्याच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही कुणीही तपासून पाहू शकता. कुणाची जमीन कुठे आहे, हे लगेच कळते. सुप्रिया सुळे, सदानंद सुळे, विजय सुळे, रेवती सुळे, शरद पवार, प्रतिभा पवार या सहा जणांची जमीन नाही, हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकते, असे प्रत्युत्तर कथित १२० एकर जमिनीच्या आरोपांवर बोलताना सुप्रिया सुळे यांनी दिले.
तर तुला सर्व जमीन देऊन टाकते, कोऱ्या कागदावर सही करते
माझ्यावर दुसरा कुठलाच आरोप करायला नाही म्हणून असे आरोप होतात. त्याच्यात काही तथ्य नाही. म्हणून मी त्या आरोप करणाऱ्याला म्हटले तुला जर माझ्या १२० एकर जमिनीची माहिती मिळाली तर सर्व जमीन तुला देऊन टाकते, कोऱ्या कागदावर सही करायला देखील तयार आहे, असेही सुप्रिया म्हणाल्या.