मुंबई: विधीमंडळात रमी खेळताना आढळल्यानंतर तत्कालीन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. छावा संघटनेनं यावर आक्रमक पवित्रा घेत, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना जाब विचारला होता. त्यांनी चालू पत्रकार परिषदेत येत तटकरे यांच्यासमोर पत्ते टाकले होते. या प्रकारानंतर अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना मारहाण केली होती.
advertisement
या प्रकारानंतर सूरज चव्हाण यांची हकालपट्टी करण्यात आली होती. पण आता महिनाभरात राष्ट्रवादीकडून चव्हाण यांचं राजकीय पुनर्वसन केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सूरज चव्हाण यांची प्रदेश सरचिटणीसपदी निवड केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, आदिती तटकरे, नवाब मलिक, समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. या नियुक्तीवरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटातील नेत्यांवर कठोर शब्दांत हल्लाबोल केला आहे.
रोहित पवारांनी साधला निशाणा
सूरज चव्हाण यांच्या नियुक्तीनंतर रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करत पक्षातील काही नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, "लातूरमध्ये केलेल्या गुंडगिरीप्रकरणी पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेण्याचा अजितदादांचा निर्णय योग्यच होता, परंतु महिनाभराच्या आतच त्या वादग्रस्त पदाधिकाऱ्याचे प्रमोशन केले जात असेल तर याला काय म्हणायचं?"
"अजितदादांच्या पक्षात दोन गट असून, दुसरा गट हा भाजपप्रेमी आहे. हा गट जाणूनबुजून अजितदादांची प्रतिमा खराब करण्यासाठी कार्यरत असतो. 'शब्दाला पक्का' या अजितदादांच्या प्रतिमेला धक्का देण्यासाठी कालची वादग्रस्त नियुक्ती केली गेली अशी चर्चा आहे. मारहाण करताना फ्रॅक्चर झालेल्या हातावरील प्लास्टरचा पट्टा निघण्याच्या आतच प्रमोशन केलं, नियुक्ती करणाऱ्याच्या हिमतीला दाद द्यावी लागेल. शेवटी, 'विनाशकाले विपरीत बुद्धी'!" अशा शब्दांत रोहित पवारांनी टीकास्र सोडलं आहे.