नेमकं प्रकरण काय?
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 मार्च रोजी पातुर्डा येथे राहणाऱ्या शिक्षिका वृषाली गावंडे ह्या पिंपळगाव काळे येथे नेहमी प्रमाणे शाळेत जाण्यासाठी निघाल्या होत्या. कवठळ गावाजवळून जात असताना एका मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात शिक्षिका वृषाली यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी ही तशा पद्धतीने मृत्यूची नोंद केली.
advertisement
मात्र महिलेच्या नातेवाईकांना या प्रकरणी संशय आल्याने त्यांनी पोलिसांकडे याबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला. पोलिसांनीही तपास चक्रे फिरवत तांत्रिक पुराव्यांच्या आधारे हा मृत्यू साधारण अपघातात झाला नसल्याचं निष्पन्न केलं. या अपघातात मृत्यू पावलेल्या शिक्षिका वृषाली गावंडे यांचा खून त्यांचे पती प्रकाश गावंडे यांनी सुपारी देऊन घडवून आणल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी तपासातून उघडकीस आणली.
आरोपी प्रकाश गावंडे याने गावातीलच मित्र मंगेश चौहुलकर याच्या मदतीने वाहन चालक मनीष सूर्यवंशी याला 1 लाख रुपयांची सुपारी देऊन पत्नीचा खून केला आहे. पोलिसांनी या तीनही आरोपींना वाहन आणि सुपारी म्हणून दिलेल्या रकमेसह अटक केली आहे. एका शिक्षिकेला मारण्यासाठी तिच्याच नवऱ्याने अशाप्रकारे खूनी खेळ केल्याने संपूर्ण बुलढाणा जिल्हा हादरला आहे.
