बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव राजा गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत एक भयंकर प्रकार घडला आहे. प्राथमिक शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्याला अमानुष मारहाण करत स्केल पट्टीने या विद्यार्थ्यांची पाठ सोलून काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने बुलढाणा शहरात मोठी खळबळ उडाली आहे,
समोर आलेल्या माहितीनुसार, विलास चीम असं या नराधम शिक्षकाचे नाव असल्याची माहिती समोर येत आहे. गृहपाठ केला नाही म्हणून या विद्यार्थ्याला या राक्षस शिक्षकाने निर्दयीपणे अमानुष मारहाण केली आहे. चौथ्या वर्गात शिकणाऱ्या दहा वर्षीय चिमुकल्याला अशा पद्धतीने मारहाण केल्यानंतर उपचारासाठी खामगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या संपूर्ण धक्कादायक प्रकारानंतर पालकांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे.
advertisement
शाळांमधील शिस्तीच्या नावाखाली होणाऱ्या शारीरिक शिक्षेला कायद्याने स्पष्ट बंदी आहे. तरीही अशा घटना पुन्हा पुन्हा समोर येत असतील, तर प्रशासनाची देखरेख, शिक्षण विभागाची जबाबदारी आणि शिक्षक प्रशिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. मुलांवर शारीरिक किंवा मानसिक अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा होणे अत्यावश्यक आहे, अन्यथा अशा प्रवृत्तींना खतपाणी मिळत राहील.
पालक आपल्या मुलांना सुरक्षिततेच्या भावनेने शाळेत पाठवतात. पण अशा घटनांमुळे हा विश्वास डळमळीत होतो. शिक्षण हे भीतीवर नव्हे, तर समज, संवाद आणि प्रोत्साहनावर फुलते. चूक करणाऱ्या विद्यार्थ्याला समज देणे, मार्गदर्शन करणे हे शिक्षकाचे कर्तव्य असते; मारहाण करणे नव्हे.
या घटनेनंतर संबंधित शिक्षकावर तातडीने कठोर कारवाई करणे, शाळांमध्ये बालसंरक्षण यंत्रणा अधिक सक्षम करणे आणि शिक्षकांच्या वर्तनावर सातत्याने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा “शाळा म्हणजे मंदिर” ही संकल्पनाच ढासळण्याचा धोका निर्माण झाला आहे. समाज म्हणून आपण अशा क्रूरतेविरुद्ध ठाम भूमिका घेणे ही काळाची गरज आहे.
