नेमका वाद कशामुळे झाला?
मिळालेल्या माहितीनुसार, मतदानाची वेळ संपल्यानंतर ईव्हीएम (EVM) मशीन घेऊन जाण्याची प्रक्रिया सुरू असताना हा वाद उफाळून आला. भूषण भोईर हे मतदान केंद्रात का आले? यावरून शिंदे समर्थक आणि भोईर समर्थक आमनेसामने आले. ईव्हीएम मशीन पळवून नेण्याचा प्रयत्न होत असल्याच्या संशयावरून दोन्ही बाजूचे कार्यकर्ते भिडले. यावेळी काही वाहनांची तोडफोड करण्याचाही प्रयत्न झाला, तसेच मतपेटी घेऊन जाणारी बस अडवल्याने गोंधळात अधिकच भर पडली.
advertisement
दोन्ही बाजूंचे गंभीर आरोप-प्रत्यारोप
या राड्यांनंतर दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. "भूषण भोईर यांनी बाहेरून जमाव आणला होता. त्यांच्याकडे हत्यारे होती आणि कोणाची तरी हत्या करण्याचा त्यांचा कट होता," असा खळबळजनक दावा शिंदे यांनी केला आहे. तर मीनाक्षी शिंदे यांच्या समर्थकांनी भूषण भोईर यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकल्याचा आरोप भोईर समर्थकांकडून करण्यात आला आहे.
जुन्या वादाची किनार
खरं तर, प्रभाग क्रमांक ३ मधून शिवसेनेनं तिकीट नाकारल्यामुळे भूषण भोईर यांनी अपक्ष म्हणून आपला पॅनल उभा केला होता. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मीनाक्षी शिंदे यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती, ज्यामध्ये त्यांनी आगरी समाजाबद्दल वादग्रस्त विधान केल्याचा आरोप होता. तेव्हापासूनच या प्रभागात तणावाचं वातावरण होते. तसेच मतदानाच्या दिवशी भोईर समर्थकांकडून पैसे वाटले जात असल्याचा आरोपही ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता, जो भोईर यांनी फेटाळून लावला होता. सध्या या परिसरात तणावपूर्ण शांतता असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस पहारा ठेवण्यात आला आहे.
