राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात जागावाटपावरून शिवसेना आणि भाजपामध्ये जोरदार रस्सीखेंच सुरू आहे. या जागावाटपावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मंगळवारी रात्री तब्बल 5 तास मॅरेथॉन चर्चा झाली. या चर्चेत जागावाटपाचा फॉम्युला ठरल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलंय
ठाण्यात शिवसेनेच्या वाट्याला 81 जागा तर भाजपच्या वाट्याला 45 जागा येण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे. मित्र पक्षांना 5 जागा देण्याचं निश्चित झालंय खरं तर भाजपकडून 55 जागांची मागणी करण्यात आली होती पण शिवसेनेनं 45 जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. 2017 मध्ये अखंड शिवसेनेचे 67 उमेदवार विजयी झाले होते. शिवसेनेनं बहुमत मिळवलं होतं. अखंड राष्ट्रवादी काँग्रेसचे 34 तर भाजपचे 23 उमेदवार जिंकले होते.पण गेल्या काही वर्षात भाजपची ताकद वाढलीय..म्हणूनचं जागा वाटपावरून भाजप-सेनेत रस्सीखेच सुरु होती.
advertisement
दरम्यान काही दिवसांपूर्वी ठाण्यात उपमुख्यमंत्री शिंदेंविरोधात दंड थोपटणाऱ्या गणेश नाईकांकडील ठाणे महापालिका निवडणुकीचं मुख्य प्रभारी पद काढून निरंजन डावखरेंकडे देण्यात आलं आहे.
गेल्या काही दिवसातल्या नाईकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे युतीत तडे जाऊ नये म्हणून भाजपने ही सावध भूमिका घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री गणेश नाईक यांची बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील इतर महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याचं कळतंय.
ठाणे जिल्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला...पण याच ठाणे जिल्ह्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणही येतात आणि त्यामुळेच ठाणे पालिकेतील जागा वाटपाला राजकीय महत्व प्राप्त झालं होतं.
