ठाणे - मेहनत आणि जिद्द असेल तर व्यक्ती व्यवसाय करुनही चांगली कमाई करू शकतो, हे एका तरुणाने सिद्ध करुन दाखवले आहे. आईच्या मदतीने 29 वर्षीय तरुणाने पाच वर्षांपूर्वी ठाण्यात स्वतःची देशमुख किचन नावाची खानावळ सुरू केली. राहुल देशमुख असे या तरुणाचे नाव आहे. इथे मिळणारी चिकन थाळी ठाणेकरांमध्ये खूप प्रसिद्ध झाली आहे.
advertisement
दिवसाला तो फक्त चिकन थाळी विकून तब्बल 5 हजार रुपयांहून अधिक रुपयांची कमाई करत आहे. घरातील मोठा मुलगा म्हणून जबाबदारी अंगावर होती आणि म्हणूनच राहुलने इतर कुठे जॉब करण्यापेक्षा हा व्यवसाय सुरू केला. दररोज 100 ते 150 लोकांना डब्बा देशमुख किचन मार्फत पुरवला जातो.
संपूर्ण ठाण्यातून वेगवेगळ्या भागात देशमुख किचन जेवण पुरवते. खाण्याच्या वागळे पोलीस स्टेशनला जेवण हे देशमुख किचनकडून पुरवले जाते. देशमुख किचनची खासियत म्हणजे याठिकाणी फक्त 70 रुपयात अत्यंत चविष्ट अशी व्हेज थाळी मिळते.
देशमुख किचनच्या या रोजच्या थाळीमध्ये रोज वेगवेगळे पदार्थ असतात. यामध्ये चिकन थाळी ग्रेव्ही, चिकन थाळी सुकी, रस्सा चिकन, चिकन प्लेट आणि व्हेजमध्ये सुद्धा बटाट्याची भाजी, भेंडीची भाजी, मसूरची भाजी, डाळ आणि त्यासोबत ताक उपलब्ध असते.
'अनेक जण म्हणतात की मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही. पण हे वाक्य खोटं आहे. मलाही सुरुवातीला भीती वाटत होती. पण जसजशी सुरुवात झाली आणि लॉकडाऊन नंतर एक आत्मविश्वास आला की कोणत्याही जॉब शिवाय स्वतःचा व्यवसाय असेल तर आपण काहीही करू शकतो. हाच निर्धार ठेवून मी देशमुख किचन व्यवसाय वाढवला. माझा कायमच लोकांना कमी पैशात चांगले देता यावे हा विचार होता आणि देशमुख किचनमुळे माझा हा विचार सत्यात उतरला आहे,' असे तरुण व्यावसायिक राहुल देशमुख यांनी सांगितले.
तर 'मी गेले दोन वर्ष देशमुख किचनमध्ये रोज जेवायला येतो. यांच्या इकडची स्वच्छता पाहून अगदी घरी जेवायला आल्यासारखं वाटते. देशमुख किचन मधली मासोळी माझी सगळ्यात आवडता पदार्थ आहे,' असे इथे जेवायला येणाऱ्या विजय कातकर यांनी सांगितले. तुम्हालाही चविष्ट नॉनव्हेज थाळी आणि व्हेज थाळीचा आस्वाद घ्यायचा असेल तर नक्कीच राहुल देशमुख च्या देशमुख किचनला नक्की भेट द्या.