नाशिक : नगरपालिकांच्या अलीकडील निकालांनंतर राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असून, नाशिकमध्ये महायुतीतील जागावाटपाचा पेच अधिकच वाढला आहे. शिवसेनेला अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळाल्यानंतर पक्षाने थेट आक्रमक भूमिका घेत भाजपकडे मोठ्या संख्येने जागांची मागणी केली आहे. सुरुवातीला 45 जागांची मागणी करण्यात आली होती, मात्र आता ती वाढवून जवळपास 50 जागांपर्यंत नेण्यात आल्याने भाजपची अडचण वाढली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनेही मंत्र्यांसह आमदारांची फौज शहरात उतरवत 30 ते 40 जागांवर दावा केल्यामुळे महायुतीतील तिढा अधिक गुंतागुंतीचा बनला आहे.
advertisement
स्वबळाचा नारा?
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून ‘स्वबळाचा पर्याय खुला ठेवा’ असा स्पष्ट संदेश मिळाल्याने पक्षाने 2017 च्या महापालिका निवडणुकीतील रणनीती पुन्हा अवलंबण्यास सुरुवात केली आहे. म्हणजेच, शेवटच्या क्षणापर्यंत मित्रपक्षांना चर्चेत गुंतवून ठेवायचे आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्यास स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवायची. याच अनुषंगाने भाजपकडून केवळ महायुतीतील पक्षच नव्हे, तर मनसेच्या काही माजी नगरसेवकांनाही आपल्या गोटात आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे. या हालचालींमुळे महायुतीत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भेट नाकारली
महायुतीच्या जागावाटपाबाबत वरिष्ठ नेत्यांनी तोडगा काढण्याचे निर्देश दिले असले, तरी प्रत्यक्षात नाशिकमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमध्ये कोणताही ठोस एकमताचा फॉर्म्युला तयार होताना दिसत नाही. शिवसेनेने सातत्याने जागांची संख्या वाढवत दबावाची रणनीती अवलंबली असून, राष्ट्रवादीनेही आक्रमक पवित्रा घेतल्याने भाजप अडचणीत सापडली आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर आणि नितीन पवार यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता ती भेट नाकारण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भाजपचा बी प्लॅन तयार
या पार्श्वभूमीवर भाजपने ‘बी प्लॅन’वर काम सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीने अवास्तव मागण्यांवर ठाम राहिल्यास, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत केवळ चर्चा सुरू ठेवायची आणि नंतर मित्रपक्षांतील असंतुष्ट किंवा माजी नगरसेवकांना पक्षात प्रवेश देत स्वबळाचा नारा द्यायचा, अशी रणनीती आखली जात आहे. त्यामुळे मित्रपक्षही आता सावध झाले असून, प्रत्येक हालचालीकडे बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
दरम्यान, सोमवारी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर भाजपकडून मित्रपक्षांची जागानिहाय आकडेवारी सादर करण्यात आली होती. मात्र त्यानंतर राष्ट्रवादीशी स्वतंत्र चर्चा न करता त्यांनी थेट मुंबई गाठल्याने राजकीय चर्चांना अधिकच उधाण आले आहे. शिंदे गटाशी चर्चा सुरू ठेवा, असा संदेश दिल्याचेही समजते. या सर्व घडामोडींमुळे नाशिकमध्ये महायुतीचे गणित दिवसेंदिवस कठीण होत चालले असून, 2017 च्या धर्तीवर युती तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे संकेत सूत्रांकडून दिले जात आहेत.
