कडव्या डाव्या संघटनांविरोधात राज्य सरकारने संमत केलेल्या जनसुरक्षा कायद्याच्या निषेधासाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये डाव्या पक्षांसह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली. मूळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे, उल्का महाजन, डावे नेते अजित अभ्यंकर आदी नेते उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी डावे पक्ष आणि शिवसेनेच्या संघर्षाच्या आठवणींना उजाळा दिला. मागे वळून पाहताना उगीच भांडलो असे वाटते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
advertisement
डाव्यांच्या व्यासपीठावर तुम्ही कसे आले?
उद्धव ठाकरे म्हणाले, "डावे-उजवे करण्याची खरंच गरज वाटत नाही. जनसुरक्षा कायदा किती वाईट आहे, हे लोकांना पटवून द्यायला हवे. शिवसेना आणि डाव्या पक्षांचा भयानक संघर्ष झाला. पण कालांतराने कळते की आपण ज्यासाठी लढतो आहोत ते बाजूला राहते आणि आपण उगीचच भांडत बसतो. राजकारणात व्यक्तिगत द्वेष, सूड असता कामा नये. म्हणूनच मी शरद पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह डाव्यांच्या व्यासपीठावर आलो कारण आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये देशप्रेम हा समान धागा आहे".
भाजपसोबत राहून आमचे २५ ते ३० वर्षे वाया गेली
भारतीय जनता पक्षाचा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नव्हता. त्यांचा संयुक्त महाराष्ट्र लढ्यातही सहभाग नव्हता. त्यामुळे दुसऱ्यांचे महापुरूष चोरायचे, असा त्यांचा आजपर्यंतचा धंदा राहिला आहे. हे आयत्या बिळावर नागोबा आहेत, यांच्याकडे कोणतेही आदर्श नाहीत. म्हणून दुसऱ्यांचे आदर्श चोरतात. भाजपसोबत राहून आमचे २५ ते ३० वर्षे वाया गेली, असेही ठाकरे म्हणाले.
वल्लभभाईंना पंतप्रधान केले असते तर संघ दिसलाच नसता
नेहरूंऐवजी वल्लभभाईंना पंतप्रधान केले असते तर हा प्रश्न भाजपच्या लोकांना पडतो. पण जर वल्लभभाई पटेल पंतप्रधान झाले असते तर संघ राहिलाच नसता. कारण त्यांनीच संघावर बंदी आणली होती, असे ठाकरे म्हणाले. तसेच देशातल्या कोणत्याही समस्येला नेहरूंना दोषी ठरविणाऱ्या भाजपच्या नेत्यांवरही ठाकरे यांनी तोड डागली. सगळं काही नेहरूंनी केले. तुमचाही जन्मही त्यांच्याच काळात झाला, मग त्यात नेहरूंचा काय दोष? असे ठाकरे म्हणाले.