संजय राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दुपारी भेट घेतली. त्यांच्यासोबत शिवसेना सचिव, आमदार मिलिंद नार्वेकर होते. जवळपास अर्धा-पाऊण तास त्यांनी संजय राऊत यांच्याशी आणि त्यांच्या कुटुंबियांशी गप्पा मारल्या.
तलवार काढून तो मैदानात येईल!
"संजयची भेट घ्यायची, असे बरेच दिवस म्हणत होतो. पण त्याच्यावर उपचार सुरू होते. आज मी त्याला भेटलो. तो अतिशय टवटवीत दिसत होतो. प्रसन्न होता, त्याच्याशी गप्पा झाल्या, प्रकृतीची माहिती घेतली, आता तो बरा आहे", असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्याचवेळी लवकरच तो तलवार काढून मैदानात येईल, असे शिवसेना स्टाईलने सांगत संजय राऊत यांच्या सार्वजनिक जीवनातल्या पुनरागमनावर त्यांनी भाष्य केले.
advertisement
संजय राऊतांना दुर्धर आजाराने ग्रासले, प्रकृती सुधारणा
शिवसेना पक्ष आणि उद्धव ठाकरे यांची बाजू खमकेपणाने मांडणारे, महाविकास आघाडी सरकार बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले, शिवसेनेत फूट पडल्यानंतर सोडून गेलेल्या सगळ्या नेत्यांना अंगावर घेऊन महाराष्ट्रात रान उठवणारे नेते, मुलूखमैदानी तोफ संजय राऊत हे गेल्या महिन्याभरापासून आजारी आहेत. त्यांना एका दुर्धर आजाराने ग्रासले आहे. त्यामुळे दोन ते तीन महिने सार्वजनिक जीवनापासून आणि राजकारणापासून दूर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक नेतेमंडळी त्यांची भेट घेऊन आस्थेने विचारपूस करीत आहेत.
