पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतून गेलेली सत्ता पुन्हा मिळविण्यासाठी अजित पवार यांचा कसोशीने प्रयत्न सुरू आहे. त्यासाठीच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र लढावे, असे प्रयत्न सुरू आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यासाठी होकार दिला आहे. असे असताना ज्या पुरोगामी विचारांसाठी गेली २५ वर्षे आपण शरद पवार यांच्यासोबत होतो, तोच पक्ष आता सत्तेच्या वळचणीला जायची तयारी करीत असेल तर आपण त्यातून बाहेर पडले पाहिजे, असे मानून जगताप यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी रात्री फोन केला.
advertisement
उद्धव ठाकरे यांचा प्रशांत जगताप यांना फोन
आपण पुरोगामी विचारांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे कळाल्यानंतर मी आपणास फोन केला, असे उद्धव ठाकरे जगताप यांना म्हणाले. त्यावर जगतापांनी घडलेल्या प्रसंगांवर प्रकाश टाकला. आपण पक्ष सोडण्याच्या निर्णयापर्यंत का आलो, हे ठाकरे यांना सांगितले. त्यावर आम्ही भारतीय जनता पक्षासोबत जाणार नाही, असे सांगत तुम्ही शिवसेना पक्षात या, असे खुले निमंत्रण उद्धव ठाकरे यांनी दिले.
ठाकरेंच्या ऑफरवर प्रशांत जगताप काय म्हणाले?
महायुतीमुळे राज्याचे वाटोळे झाले आहे. त्यांच्यासोबत जाऊच शकत नाही. माझी लढाई पुरोगामी चळवळ, संविधानाच्या बाजूने आहे. महायुती सरकारला आव्हान देऊ शकतील अशा पक्षात जाण्याचा निर्णय घेईल, असे जगताप यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले. तसेच ठाकरे यांचे निमंत्रण नम्रपणे ऐकून विचार करून कळवतो, असे जगताप यांनी सांगितले. उभय नेत्यांमध्ये जवळपास साडे नऊ मिनिटे चर्चा झाली. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा बोजवारा उडण्याला महायुती कशी जबाबदार आहे, हे सांगताना त्यांच्याशी हातमिळवणी होऊच शकत नाही, असे जगताप यांनी ठाकरेंना सांगितले. ज्या महायुतीवर आम्ही गेली तीन वर्षे आरोप करतोय, त्यांच्याच घटक पक्षासोबत आम्ही आघाडी केली तर लोकांसमोर काय मुद्दे घेऊन जाऊ, अशा उद्विग्न भावना जगताप यांनी व्यक्त केल्या.
