परमेश्वर सुभाष लोखंडे असं हत्या झालेल्या २८ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा येथील रहिवासी होता. तर मामा अनिल कांबळे आणि मावस भाऊ अर्जुन रामफळे असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. जमिनीच्या जुन्या वादातून होणाऱ्या शिवीगाळ व भांडणाला कंटाळून मामा आणि मावस भावाने मिळून सख्ख्या भाच्याला रॉड आणि काठीने बेदम मारहाण करत त्याचा खून केला आहे. खून केल्यानंतर आरोपींनी मृतदेह क्रूझर गाडीतून नेऊन रस्त्याच्या कडेला फेकला होता.
advertisement
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत परमेश्वर लोखंडे आणि त्याचा मावस भाऊ अर्जुन रामफळे यांच्यात रात्रीच्या सुमारास एका दारूच्या दुकानात जमिनीच्या कारणातून वाद झाला होता. हा वाद वाढल्यानंतर अर्जुन रामफळे आणि त्याचे मामा अनिल कांबळे यांनी परमेश्वरला रॉड आणि काठीने अमानुष मारहाण केली. या मारहाणीत परमेश्वर लोखंडे याचा जागीच मृत्यू झाला.
हत्येनंतर मृतदेह फेकला
खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मामा अनिल कांबळे आणि मावस भाऊ अर्जुन रामफळे यांनी रात्रीच परमेश्वरचा मृतदेह एका क्रूझर गाडीत टाकला. त्यानंतर त्यांनी हा मृतदेह भोकरदन-जालना रोडवरील डावरगाव फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला फेकून दिला आणि दोघेही पुन्हा घरी परतले.
दुसऱ्या दिवशी सकाळी काही नागरिकांना डावरगाव फाट्याजवळ हा मृतदेह आढळून आला. त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ तपास चक्रे फिरवली आणि अवघ्या दोन तासांत खुनाचा हा गंभीर गुन्हा उघडकीस आणला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. जमिनीच्या किरकोळ वादातून भाच्याचा खून झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.