गेली १० वर्षे तालुक्यातील जनतेचे मला अमाप प्रेम मिळाले. दहा वर्षे मला कुडाळचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. विधानसभेत कोकणच्या प्रश्नावर आणि कुडाळच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर विधानसभेत आवाज उठविल्याचे सांगत जनतेने दिलेल्या संधीबद्दल त्यांनी आभार मानले.
आमदारकीचा कार्यकाळ सांगताना वैभव नाईक यांना अश्रू अनावर
मला आता आमदार म्हणू नका. वैभव नाईक म्हणून हाक मारा, हवे तर साहेब म्हणा पण आमदार म्हणू नका.... असे आर्जव त्यांनी जनतेला केले. तसेच १० वर्षांची आमदारकी मी कायम जनतेसाठी वापरली. कधीही माझ्यासाठी आमदारकी वापरली नाही, असे सांगत असताना त्यांना अश्रू अनावर झाले. पुढच्या वर्षी जोमाने लढू आणि जिंकू, असा निर्धार व्यक्त करतानाच हरलो असलो तरी तुमच्या प्रश्नांसाठी कधीही आवाज द्या, मी उभा राहीन, असा शब्दही त्यांनी जनतेला दिला.
advertisement
सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही जन्माला आलेले नसते, पराभवाबद्दल कुणालाही दोष द्यायचा नाही
झालेल्या पराभवाबद्दल आपल्याला बोलायचे नाही. कुणाला दोष द्यायचा नाही. आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये जोमाने काम करायचे आहे. आयुष्यात चढउतार येत असतात. आपण काय आजन्म आमदारपदाचा शिक्का मारून आलेलो नाही. सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही जन्माला आलेले नसते. त्यामुळे लोकांच्या प्रश्नांवर काम करून त्यांचे पुन्हा आशीर्वाद मागू, असे वैभव नाईक म्हणाले.
वैभव नाईक यांनी नारायण राणे यांचा पराभव केला होता
वैभव नाईक हे कट्टर शिवसैनिक... २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक यांनी नारायण राणे यांचा धक्कादायकरित्या पराभव करून ते राज्यात चर्चेत आले होते. सलग दोन वेळा त्यांना कुडाळ मालवणचे प्रतिनिधित्व केले.
