Bhaskar Chandanshiv Passed Away : आपल्या लेखणीतून ग्रामीण भागातील जीवन मांडणारे, लाल चिखल या कथेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहचले ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचे निधन झाले. लातूर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, शनिवारी उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने शेतकरी आणि शोषितांच्या वेदना मांडणारा साहित्यिक हरपला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
advertisement
जांभळढव्ह (1980), मरणकळा (1983), अंगारमाती (1991), नवी वारुळ (1992), बिरडं (1999) हे त्यांचे कथासंग्रह चांगलेच गाजले. ग्रामीण जीवनातील दुष्काळ, शेतकरी जीवन, आणि सामाजिक संघर्ष यावर त्यांनी आपल्या साहित्यातून भाष्य केले. लाल चिखल या कथासंग्रहात हे सूत्र ठळकपणे दिसून आले. तर, 'जांभळडव्ह', 'मरणकळा', 'नवी वारूळ', 'बिरडं' या कथासंग्रहातील काही कथांमधून दलित शोषित वर्गाच्या संघर्षाचे चित्रण दिसून आले. प्रा. भास्कर चंदनशिव हे 28 वे मराठवाडा साहित्य समेलन धाराशिवचे ते अध्यक्ष होते. राष्ट्रीय शेतकरी साहित्य संमेलनाचे ही त्यांनी अध्यक्ष स्थान भुषविले होते. अनेक शेतकरी व ग्रामीण साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षस्थान भूषविले होते. त्यांच्या साहित्याला महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील हासेगाव (ता. कळंब) येथे 12 जानेवारी 1945 रोजी जन्मलेले भास्कर देवराव यादव हे दत्तकविधानामुळे पुढे भास्कर तात्याबा चंदनशिव या नावाने ओळखले जाऊ लागले. वयाच्या अवघ्या वीसव्या वर्षी त्यांनी कथालेखनास सुरुवात केली आणि त्यातून त्यांच्या साहित्यिक प्रवासाला सुरूवात झाली. प्रा. भास्कर चंदनशिव यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा कळंब येथे झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी अंबाजोगाई येथे बी.ए. पूर्ण केले आणि नंतर छत्रपती संभाजीनगर येथे मराठी विषयातून एम.ए.ची पदवी मिळवली.
1972 मध्ये मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आष्टी येथील वरिष्ठ महाविद्यालयात मराठी प्राध्यापक म्हणून त्यांनी आपल्या अध्यापन कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी दीर्घकाळ वैजापूर येथे सेवा बजावली आणि अखेर बलभीम महाविद्यालय, बीड येथून 2005 साली सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी कळंब येथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.
साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल राज्य पातळीवरही घेण्यात आली. ते काही काळ महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य होते. तसेच अस्मितादर्श साहित्य संमेलन, मराठवाडा साहित्य संमेलन आणि वाळवा येथे पार पडलेल्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही राहिले.
प्रा. भास्कर चंदनशिव यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङमयनिर्मिती पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार, दलितमित्र पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशनचा ग्रामीण साहित्य पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी त्यांचा साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी सन्मान करण्यात आला.