अहमदनगर : आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी भाकरी फिरवण्याचे संकेत दिले आहेत. कारण एका दिवसामध्येच शरद पवारांनी विधानसभेसाठी दोन तरुण उमेदवारांना संधी देण्याचे संकेत दिले आहेत. रोहित पाटील यांच्यानंतर शरद पवारांनी अहमदनगरच्या अकोलेमधून अमित भांगरे यांना उमेदवारीचे संकेत दिले आहेत. आमदार किरण लहामटेंना खाली बसवा, अमित भांगरेंच्या मागे शक्ती उभी करा, असं आवाहन शरद पवारांनी अकोलेमधल्या शेतकरी मेळाव्यातून केलं आहे.
advertisement
काय म्हणाले शरद पवार?
'अमित आणि त्याच्या सहकाऱ्यांना शक्ती द्या, तुमची मदत असेल तर अकोल्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही. पाच वर्षांपूर्वी एका डॉक्टरला (किरण लहामटे) मी निवडून दिलं. मला वाटलं साधा माणूस आहे, शब्दाला किंमत देईल. काहीही झालं तरी पवार साहेबांची साथ सोडणार नाही, असं भाषण केलं. मुंबईत गेला आणि भलतीकडे जाऊन बसला. कुठे बसायचं हे ज्याला कळत नाही, त्याला विधानसभेला बसवायची वेळ आली आहे. अमित भांगरे या तरुणाच्या पाठीशी शक्ती उभी करा. तरुणांच्या ताकदीवर अकोले आणि महाराष्ट्राचं राजकारण बदलल्याशिवाय राहणार नाही', असं शरद पवार म्हणाले आहेत.
रोहित पाटलांनाही उमेदवारी
याआधी सांगलीच्या कवठेमहांकाळ येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना शरद पवारांनी रोहित पाटलांना विधानसभेच्या उमेदवारीचे संकेत दिले होते. उद्याच्या निवडणुकीत रोहित पाटलांना साथ द्या. मला खात्री आहे, तुमच्या प्रश्नांची सोडवणूक नक्की होईल, असं म्हणत शरद पवारांनी तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून रोहित पाटलांना अप्रत्यक्ष उमेदवारी जाहीर केली.