बीड : विधानसभा निवडणुकीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पहिल्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. लक्ष्मण हाके यांनी बीडच्या गेवराई मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार प्रियंका खेडकर यांना पाठिंबा दिला आहे. गेवराई तालुक्यातील गडी येथे ओबीसी कार्यकर्त्यांनी लक्ष्मण हाके यांची गाडी अडवली आणि भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली.
कार्यकर्त्यांनी अडवल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करत प्रियंका खेडकर यांना निवडून देण्याचं आवाहन केलं. बीड जिल्ह्यात लक्ष्मण हाके यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेतली आहे, त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची ताकद वाढली आहे.
advertisement
अजित पवारांच्या सभेनंतर बीडच्या गेवराई मतदारसंघात ओबीसी आक्रमक झाले आणि त्यांनी लक्ष्मण हाकेंची गाडी अडवून उमेदवार घोषित करण्याची मागणी केली. यानंतर लक्ष्मण हाके यांनी गेवराई मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार प्रियंका खेडकर यांच्या नावाची घोषणा करत त्यांना पाठिंबा दिला. लक्ष्मण हाकेंच्या या भूमिकेमुळे गेवराईमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं गणित बिघडण्याची शक्यता आहे.